आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Day Series : India new Zealand Fight Against Eachother

एकदिवसीय मालिका: भारत-न्यूझीलंड झुंज आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपियर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे रविवारी होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यातील पराभवाने टीम इंडियाने निराशेत मागच्या वर्षाला निरोप दिला. मात्र, आता धोनी ब्रिगेड नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्यास सज्ज आहे.
या मालिकेत भारताचे क्रमवारीतील नंबर वनचे सिंहासनसुद्धा धोक्यात आहे. जागतिक क्रमवारीतील आपले सिंहासन कायम ठेवण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका जिंकावीच लागेल. जर चुकून जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाचा संघ न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला तर आपल्या हातून नंबर वनची खुर्चीही हिसकावली जाईल. दोन्ही संघांची वर्तमानातील कामगिरी पाहिली तर भारताने आफ्रिकेविरुद्ध
वनडे मालिका 2-0 ने गमावली. दुसरीकडे न्यूझीलंडने वेस्ट इंडीजविरुद्ध 2-2 ने वनडे मालिका बरोबरीत सोडवली.
ग्रीन टॉप विकेटवर खेळावे लागेल
भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडने ग्रीन टॉप विकेट तयार केल्या आहेत. यावर भारताला शॉर्टपिच आणि उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागेल. मात्र, गेल्या काही वर्षांतील भारताची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी पाहिली तर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढेल. भारताने 2008-09 मध्ये न्यूझीलंडमध्ये वनडे मालिकेत 3-1 ने विजय मिळवला होता. यानंतर 2010-11 मध्ये भारताने भारतात न्यूझीलंडला 5-0 ने धुतले होते.
गोलंदाजी दुबळी बाजू
भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, मो. शमी, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा, वरुण अ‍ॅरोन हे पाच गोलंदाज आहेत. नेपियर येथील वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी बघून धोनी चार वेगवान गोलंदाजांना संधी देऊ शकतो. रविचंद्रन अश्विन ऑफस्पिनर म्हणून संघात असेल.
दुसरीकडे न्यूझीलंडची टीमही घरच्या मैदानावर मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे.
फलंदाजी आहे मजबूत बाजू
भारताच्या फलंदाजीची मदार पुन्हा एकदा अव्वल तीन फलंदाज शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असेल. या तिघांनी मागच्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. मधल्या फळीत सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा असतील. असे असले तरीही न्यूझीलंडच्या भूमीवर खेळण्याचा अनुभव धोनी, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्याकडेच आहे.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, भुवनेश्वरकुमार.
न्यूझीलंड : ब्रेंडन मॅक्लुम (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, जेसी रायडर, केन विलयसन, रॉस टेलर, कोरी अँडरसन, जेम्स निशाम, ल्युक राँची, नॅथन मॅक्लुम, अ‍ॅडम मिलने, केली मिल्स, टीम साऊथी, मिशेल मॅक्लिनघन.
संघात चार वेगवान गोलंदाज
आम्ही चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची योजना तयार करीत आहोत. आम्ही सुरुवातीपासून आमच्या वेगाने भारतीयांना घाम फोडण्याचा प्रयत्न करू. भारतीय संघ मजबूत असून, त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. - ब्रेंडन मॅक्लुम.