आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या एका विकेटने न्यूझीलंडचा इंग्लंडविरुद्ध विजय हुकला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलँड - इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज मॅट प्रायरने दुस-या डावात झळकावलेल्या झुंजार शतकामुळे (नाबाद 110) इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध तिसरी कसोटी बरोबरीत सोडवली. यासह तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने ड्रॉ झाले. न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या एका गड्याची गरज असताना मॅट प्रायरने अकराव्या क्रमांकाचा फलंदाज माँटी पानेसरसह झुंज देऊन इंग्लंडचा पराभव टाळला.


न्यूझीलंडने पहिल्या डावात 443 धावा काढल्या होत्या. यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात 204 धावांत रोखून किवीज गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडने 6 बाद 241 धावा काढून आपला दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर इंग्लंडसमोर विजयासाठी अवघड असे 481 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने दुस-या डावात 9 बाद 315 धावा काढून लढत ड्रॉ केली. सामन्याच्या चौथ्या दिवसअखेरच इंग्लंडने अवघ्या 90 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा विजय आणि इंग्लंडचा पराभव होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर चमत्कार झाला.


मॅट प्रायरने झुंज दिली आणि संघाचा अशक्यप्राय वाटणारा पराभव टाळला. न्यूझीलंडच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. चौथ्या दिवसअखेर इयान बेल 8 धावांवर खेळत होता. पाचव्या दिवशी बेलने 271 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांसह 75 धावा काढल्या. इंग्लंडचा भरवशाचा युवा फलंदाज रुट केवळ 29 धावा काढून चालता झाला. जॉन बॅरिस्ट्रोला तर केवळ 6 धावा काढता आल्या. 150 च्या स्कोअरवर रुट, 159 च्या स्कोअरवर बॅरिस्ट्रो आणि 237 धावा झाल्या असताना बेल बाद झाला.


दुस-या टोकाने प्रायरने 182 चेंडूंचा सामना करताना 20 चौकारांच्या मदतीने नाबाद 110 धावा काढल्या. न्यूझीलंडकडून केन विल्यम्समनने 44 धावांत 4 गडी बाद केले. वॅग्नर आणि साऊथीने दोघांना बाद केले.


प्रायरची तळाच्या खेळाडूंसोबत झुंज
बेल बाद झाल्यानंतर मॅट प्रायरने खिंड लढवली. प्रायरने तळाचा फलंदाज स्टुअर्ट ब्रॉडसोबत तब्बल 29 षटके झुंज दिली. ब्रॉडने 77 चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने अवघ्या 6 धावा काढल्या. दुस-या टोकाने प्रायर लढत होता. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने प्रायरने शतक ठोकले. जेम्स अँडरसन शून्यावर बाद झाल्यानंतर पानेसरच्या रूपाने इंग्लंडची अखेरची विकेट शिल्लक होती. प्रायर आणि पानेसर यांनी 3.1 षटके खेळून काढली आणि पराभव टाळला. इंग्लंडच्या 9 बाद 315 धावा झाल्या असताना पंचांनी सामना ड्रॉ झाल्याचे घोषित केले.
हेही आहे महत्त्वाचे- कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये चौथ्या डावात एखाद्या संघाचे 9 गडी बाद झाल्यानंतर सामना ड्रॉ होण्याची ही नववी वेळ ठरली. यापैकी तब्बल सहा वेळा इंग्लंडची टीमच पराभवाच्या उंबरठ्यावर होती.


कसोटीच्या चौथ्या डावात शतक ठोकणारा मॅट प्रायर पाचवा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.
अविश्वसनीय क्रिकेटच्या मैदानावर असे विहंगम दृश्य क्वचितच बघायला मिळते. इंग्लंडचा तळाचा फलंदाज माँटी पानेसरला बाद करण्यासाठी किवीज कर्णधाराने असे दहा खेळाडूंचे क्षेत्ररक्षण रचले होते. दुस-या छायाचित्रात शतक ठोकल्यानंतर सामन्यादरम्यान मॅट प्रायरचे अभिनंदन करताना इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड.


संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 443 आणि 6 बाद 241. इंग्लंड- 204 आणि 9 बाद 315 (अ‍ॅलेस्टर कुक 43, जोनाथन ट्रॉट 37, इयान बेल 75, जे. रुट 29, मॅट प्रायर नाबाद 110, 4/44 केन विल्यम्समन, 2/77 टीम साऊथी, 2/61 एन. वॅग्नर). सामन्याचा निकाल : ड्रॉ. मालिका : 0-0 ने बरोबरीत.