आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर खेळांमधील खेळाडूही करणार आता हुतुतू !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - मातीतला अस्सल मर्दानी खेळ म्हणून प्रसिद्ध कबड्डीत भारतातील तमाम युवकांना कर्तबगारी दाखवावी वाटते. प्राचीन काळापासून खेळल्या जात असलेल्या कबड्डीवर भारतीयांचेच वर्चस्व राहिले आहे, परंतु परदेशात मात्र हा खेळ तितकासा प्रसिद्ध नाही आणि विशिष्ट खेळाडूच हा खेळ खेळत असतील, असेही नाही. याचा प्रत्यय पंजाबमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळतो.
रविवारपासून येथे सुरू झालेल्या पुरुष आणि महिलांच्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत जगातील सुमारे 12 पुरुष तर 8 महिला संघांनी प्रवेश नोंदवला आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, बहुतांश संघांमध्ये केवळ कबड्डीचेच नव्हे तर इतरही खेळ प्रकारातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यापैकी काही रग्बी, काही अ‍ॅथलेटिक्स तर काही फुटबॉलचे खेळाडू आहेत. अनेकांनी या खेळांमध्ये सुवर्णपदकांपर्यंत मजल मारली आहे, परंतु आता ते कबड्डीतही आपले कसब दाखवत आहेत. न्यूझीलंडच्या कबड्डी संघात रग्बी खेळातील 8 खेळाडूंचा सहभाग आहे, हे विशेष.
भारतीय खेळाडूंचे व्हिडिओ पाहून कबड्डी शिकले पाक खेळाडू
पाकिस्तानचा महिला कबड्डी संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांपूर्वीच हा संघ तयार करण्यात आला असून आसिफ भट्टी यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणासाठी त्यांना विशेष प्रयोग करावा लागला. लाहोरमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीसाठी आयोजित सराव शिबिरात त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय महिला खेळाडूंच्या खेळाचे व्हिडिओ दाखवले. हे बघून पाक खेळाडूंनी तयारी केली.