आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक हॉकीपटूंना परत पाठवण्याचा निर्णय दुर्दैवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या हॉकीपटूंना हॉकी इंडिया लीगमध्ये न खेळवता परत जाण्यास बाध्य करण्याचा निर्णय चकित करणारा आहे. गेली अनेक वर्षे क्रीडा जगतात अशी घटना घडली नाही. ही घटना आर्मस्ट्राँगच्या डोपिंगमधील कबुली जबाबापेक्षा अधिक दुर्दैवी असल्याचे मी मानतो. भारत-पाकिस्तान यांच्यातील एलओसीच्या (लाइन ऑफ कंट्रोल) घटनेला खेळाशी जोडणे योग्य नाही. उलट खेळ तर संबंधात मधुरता आणण्यासाठी सेतूचे काम करतात. 1950, 1960 आणि 1970 च्या दशकात पश्चिम आणि पूर्वतील ब्लॉक यांच्यातील राजकीय शीत युद्धाच्या घटनेनंतरही खेळ प्रभावित झाले. 1980 मध्ये अनेक देशांनी ऑलिम्पिकचा बहिष्कार केला. ही स्पर्धा हीट ठरली. भारत-पाकिस्तानचा विचार केला तर स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांत राजकीय वाद वाढले त्या प्रत्येक वेळी खेळाने संबंध सुधारण्यास मदतच केली.
एचआयएलमध्ये पाक खेळाडूंना न खेळवण्याचा निर्णय फ्रँचायझी संघांनी घेतला. त्यांना अप्रत्यक्षपणे केंद्र शासनाने सूचना दिली असावी. हा व्यावसायिक नव्हे तर भावुक निर्णय होता. पाक हॉकीपटूंना परत पाठवण्याचा निर्णय योग्य होता की नाही, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. माझ्या माहितीनुसार पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी भारतात येत आहे. शिवसेनेच्या धमकीनंतर त्यांचे सर्व सामने आता मुंबईऐवजी कटकला होतील. अशा परिस्थितीत राजकारणाची दुहेरी भूमिका का ? हॉकीपटूंना परत पाठवण्यात आले आणि महिला क्रिकेटपटूंना हिरवा कंदील देण्यात आला. 26/11 च्या घटनेनंतर पाक क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळले नाही, हे खरे आहे. मात्र, पाक टीमने भारताचा दौरा केला आणि दोन्ही देशांतील वनडे मालिका सुपरहीट ठरली. हे बघून दोन्ही देशांत संबंध सुधारत असल्याचे वाटले होते. मालिकेदरम्यान आपल्या प्रेक्षकांनी दोन्ही देशांच्या खेळाडूंचे कौतुक केले आणि जबरदस्त खेळभावनेची प्रचिती आली.
एचआयएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना न खेळू देण्याच्या निर्णयामुळे प्रेक्षकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. पाक खेळाडूंना खेळताना पाहणे आपल्या चाहत्यांना आवडते. शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाने नेहमीच पाक खेळाडूंना भारतात खेळवण्याचा विरोध केला आहे. शिवसेना काही अडचण निर्माण करणार नाही, याची हमी देता येत नाही. देशात विविध विचारप्रणालीचे लोक असल्यामुळे तणावाची शक्यता कायम असते.
भारतीय हॉकी संघ 1990 मध्ये लाहोर येथे वर्ल्डकपचा सामना खेळण्यास गेला तेव्हा दोन्ही देशांत अत्यंत तणावाचे संबंध होते. मात्र, आपल्या संघाने प्रतिकूल परिस्थितीत खेळ केला होता. पाकिस्तानातच 2009 मध्ये श्रीलंका संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. तेव्हापासून विदेशी खेळाडूंनी पाकचा दौरा केलेला नाही. कारण तेथे सुरक्षेची गॅरंटी नाही.
भारत-पाक द्विपक्षीय खेळ संबंधाचा विचार केला तर तेथे मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा मान्य करतील की संबंध सुधारण्यात खेळाचे मोलाचे योगदान असते. दोन्ही देशांनी बॅकफूटवर जाण्याऐवजी संबंध सुधारण्यासाठी पुढे यायला हवे. यासाठी खेळांची मदत घेतली तरी काय हरकत आहे.