आबुधाबी - अखेरच्या आणि तिस-या वनडेत पाकिस्तानवर अवघ्या एका धावेने रोमांचक विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने पाकला क्लीन स्वीप करीत जबरदस्त कामगिरी केली. तिस-या वनडेत कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २३१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकला सर्वबाद २३० धावाच काढता आल्या. ग्लेन मॅक्सवेल सामनावीर तर स्टीव्हन स्मिथ मालिकावीरचा मानकरी ठरला.
धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ २३२ धावांचे विजयासाठी असलेले लक्ष्य सहज गाठेल, असे वाटत होते. त्यांची सुरुवातही चांगली झाली. सलामीवीर अहेमद शहेजाद व सरफराज अहेमद यांनी ५६ धावांची सलामी दिली. शहेजाद २६ तर सरफराज ३२ धावा काढून बाद झाले. तिस-या क्रमांकावर आलेल्या असद शफिकने चिवट खेळ करताना ७३ चेंडूत ५ चौकारांसह ५० धावा काढल्या. शोएब मकसूदने ३४ तर उमर अमीनने १९ धावांचे योगदान दिले. शाहिद आफ्रिदीला ६ धावाच काढता आल्या. आलम शून्यावर बाद झाला. मधल्या फळीच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्याने पाकचा विजय हातून निसटला.
वॉर्नर, स्मिथची अर्धशतके
ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २३१ धावा काढल्या. कांगारूंकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ५६ आणि स्टीव्हन स्मिथने ७७ धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर अॅरोन फिंचने १८, ग्लेन मॅक्सवेलने २० धावांचे योगदान दिले. अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्युकनरने ४२ चेंडूंत १ षटकार, १ चौकारांसह ३३ धावा काढल्या. स्मिथने १०५ चेंडूंत
आपली खेळी साकारली. कर्णधार जॉर्ज बेली ०, फिलिप ह्युजेस ५, ब्रेड हॅडिन २ यांना मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून गोलंदाजीत मो. इरफानने एक विकेट घेतली. सोहेल तन्वीरने ३ तर शाहिद आफ्रिदीने २ गडी बाद केले. गोलंदाजीत अन्वर अलीने एकाला टिपले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ९/ २३१. पाकिस्तान : सर्वबाद २३०. सामनावीर : मॅक्सवेल. मालिकावीर : स्टीव्हन स्मिथ.