छायाचित्र: युनूस खान
मीरपूर - अझहर अली आणि युनूस खानच्या शतकांच्या बळावर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद ३२३ धावा उभारल्या. बांगलादेशला बळी मिळवण्यासाठी तब्बल ९ गोलंदाजांचा वापर करावा लागला, तरीदेखील ते पाकिस्तानच्या अझहर आणि युनूसला शतकापासून रोखू शकले नाहीत.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय बांगलादेशच्या चांगलाच अंगलट आला. विकेट मिळण्यासाठी त्यांना झगडावे लागले. पहिल्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर मोहंमद हाफिज ८ आणि शमी अस्लम १९ स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेल्या अझहर अली आणि युनूस खानने संघाचा डावा सावरला. दोन्ही फलंदाजांनी शानदार शतके ठोकली. अझहर अली दिवसअखेर नाबाद राहिला. त्याने २५८ चेंडूंचा सामना करताना १३ सणसणीत चौकार खेचत नाबाद १२७ धावा केल्या. युनूस खानने पुन्हा एकदा
आपला अनुभव दाखवत १९५ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार खेचत १४८ धावा ठाेकल्या. त्याला मोहंमद शाहिदने शुवागाता होमकरवी झेलबाद केले. कर्णधार मिसबाह उल हक ९ धावांवर खेळत आहे. बांगलादेशकडून मो. शाहिदने २, तर तैजुल इस्लामने १ गडी टिपला.
अझहर, युनूसची द्विशतकी भागीदारी
मधल्या फळीतील अजहर अली आणि युनूस खानने शनदार द्विशतकी भागीदारी रचली. या जोडीने तिस-या विकेटसाठी ३७२ चेंडूंचा सामना करताना २५० धावा जोडल्या. तत्पूर्वी शमी अस्लम अाणि अजहर अलीने दुस-या गड्यासाठी ११६ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली.