छायाचित्र: जेतेपदासह नोवाक योकोविक आणि उपविजेता मिलोस राओनिक.
पॅरिस - जगातील नंबर वन नोवाक योकोविकने पॅरिस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने तिस-यांदा ही स्पर्धा जिंकली. सर्बियाच्या योकोविकने अंतिम लढतीत कॅनडाच्या मिलोस राओनिकला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. त्याने ६-२, ६-३ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. याशिवाय त्याने
आपल्या टेनिस करिअरमध्ये एटीपीत ६०० व्या सामन्यातील विजयाची नोंद आपल्या नावे केली. तसेच योकोविकने आपले अव्वल स्थानही अधिक मजबूत केले.
सातव्या मानांकित राओनिकने दमदार सुरुवात करताना योकोविकला रोखण्याच्या प्रयत्न केला. मात्र, सर्बियाच्या खेळाडूने पहिला सेट जिंकला तसेच लढतीत आघाडी घेतली. त्यानंतर त्याने दुस-या सेटमध्येही बाजी मारून एकतर्फी विजयाची नोंद केली.
ब्रायन बंधूंचा जेतेपदाचा चौकार
अमेरिकेच्या माइक आणि बॉब या ब्रायन बंधूंनी पॅरिस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या किताबाचा चौकार मारला. या जोडीने चौथ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली. अमेरिकेच्या या जोडीने अंतिम सामन्यात पोलंडच्या मार्सियन मात्कोवास्की आणि जुर्गेन मेल्झरला ७-६, ५-७, १०-६ ने पराभूत केले.