मुंबई - कसोटी क्रिकेट खेळणार्या 10 पूर्ण सदस्य देशांनी 2023 पर्यंतच्या दौर्याच्या कार्यक्रमांची आखणी करून त्या संदर्भातील करार येत्या ऑक्टोबर महिन्यापूर्वी आयसीसीच्या यापुढील बैठकीपूर्वी करण्याचा आदेश आज मेलबर्न येथील वार्षिक सभेनंतर देण्यात आला. सर्व संबंधित सदस्यांनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार करून द्विपक्षीय हितसंबंध जपणारे दौरे आखावेत व स्वगृही मालिका खेळवाव्यात, ज्यायोगे योग्य प्रकारचा समतोल साधला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. सर्व सदस्यांनी एकमेकांमधील मालिकांबाबतचे करार यापुढील बैठकीआधी करावेत, अशी तंबीही सदस्यांना देण्यात आली आहे.
आयसीसीच्या क्रिकेट विकास समितीने पारंपरिक सीमारेषांपलीकडे क्रिकेट हा खेळ न्यावा, असे आवाहन सदस्यांना केले आहे. गोलंदाजांच्या संशयास्पद अँक्शनवर गांभीर्याने विचार करण्यात आला असून पंच व मॅच रेफ्री यांनी अत्याधुनिक तंत्राचा बिनधास्त व बेधडक वापर करून या प्रवृत्तीला आळा घालावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने घेण्यात येणार्या केंद्रांनी मैदानांच्या सीमारेषा दूरवर व नियमात आवश्यक असलेल्या सीमारेषेसंबंधीच्या अधिक लांबीच्या असाव्यात. ट्वेंटी-20 सामन्यांमुळे मैदानाच्या सीमारेषा अधिक आखडत्या करण्यात आल्या होत्या. आयसीसीच्या समितीचे क्रिकेटविषयक बदलांबाबत आणि अन्य नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येतील.
आयसीसीचे असे आहेत नियम
- मैदानाबाहेर गेलेल्या गोलंदाजाला पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानाबाहेर व्यतीत केलेल्या कालावधीएवढा काळ मैदानात घालवल्यानंतरच मुभा देण्यात येईल किंवा 30 षटकांनंतर त्याला गोलंदाजीची संधी मिळेल.
- ट्वेंटी-20 क्रिकेटचा डाव यापुढे 80 ऐवजी 85 मिनिटांचा असेल.
- खेळाडूंसाठी सध्या वापरात असलेल्या डीआरएस निर्णय प्रणालीला आणखी 12 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
- आयसीसी बोर्डावर 10 पूर्ण सदस्यांचे व 3 सहसदस्यांचे प्रतिनिधी घेण्यात येतील.
- हॉलंड व नेपाळ या देशांना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अधिकृतरीत्याच दाखल करण्यात आले आहे.