पुणे- आयपीएच्या आठव्या मोसमातील किंग्स इलेव्हन पंजाब आणि गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना कोलकात्याने जिंकला आहे. पाच बाद 60 अशी अवस्था असताना आंद्रे रसेलने केलेल्या तुफानी फटकेबाजीने कोलकात्याचा विजय साकारला. रसेलने यशस्वी अर्धशतक केले. त्याला यूसूफ पठाणने चांगली साथ दिली.
पंजाबच्या 156 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा डाव गडगडला होता. त्यांचे आघाडीचे पाच फलंदाज अवघ्या ६० धावांत तंबूत परतले.
पंजाबच्या संदीप शर्माचे कोलकाताच्या चौघांचा बळी घेत त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. पण त्यानंतर आलेल्या रसेलने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले.
त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकात 9 बाद 155 धावा केल्या. कर्णधार जॉर्ज बेली (60) आणि ग्लेन मॅक्सवेल (33) धावा केल्या. उमेश यादवने 33 धावांत 3 गडी बाद केले.
पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मुरली विजय शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (11) आणि वृद्धीमान साहा (15) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. पंजाबने पहिल्या चार षटकातच महत्त्वाचे 3 गडी गमावले. मुरली विजयला उमेश यादवने आंद्रे रसेलकडे झेल देण्यास भाग पाडले. सेहवागला रसेलने चलते केले तर साहाला मार्केलने टिपले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने संघाचा धावफलक हालता ठेवला मात्र त्याला उमेश यादवने त्याला 33 धावांवर झेलबाद केले. थिसरा परेराने 9 धावा केल्या. कर्णधार जॉर्ज बेलीने 45 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या.
आजच्या सामन्यासाठी कोलकाता व पंजाब संघाने प्रत्येकी दोन-दोन बदल केले आहेत.
गौतम गंभीरने
आपल्या संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला पुन्हा संधी दिली आहे. पाकिस्तानसोबत एकदिवसीय मालिका सुरु झाल्याने बांग्लादेशचा खेळाडू शाकिब अल हसन मायदेशी परतला आहे. त्याच्या जागेवर कोलकात्याने रायन टेन डोसेट याला संधी दिली आहे. फिरकी गोलंदाज के. सी. करियप्पा याच्या जागी उमेश यादवला संधी दिली गेली आहे. पंजाबनेही दोन बदल करताना डेव्हिड मिलर आणि ऋषी धवन यांच्या जागी थिसारा परेरा आणि गुरकीरत सिंह मान यांना संघात स्थान दिले आहे.
असे आहेत आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ-
कोलकाता नाइटराइडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, यूसुफ पठान, उमेश यादव, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, मॉर्ने मोर्कल, पीयूष चावला, रायन टेन डोसेट, सुनील नरेन, आंद्रे रसेल.
किंग्स इलेवन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, रिद्धिमान साहा, थिसारा परेरा, गुरकीरत सिंह मान, मिचेल जॉनसन, अक्षर पटेल, अनुरीत सिंह, संदीप शर्मा.