आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्याच्या भावना: फिजिओथेरपीच ठरली नवसंजीवनी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - “हात आणि खांदे हे डायव्हिंग या खेळाचे प्राण. म्हणजे खांदा दुखत असेल किंवा हात वळत नसतील तर पोहताच येत नाही. ऐन उमेदीच्या काळात नेमक्या याच ‘शोल्डर टिश्यू’ नामक दुर्धर आजाराने मला गाठले. पोहताच येईना. प्रचंड वेदना होऊ लागल्या. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. कारकीर्द संपली असेच वाटले. मात्र, डॉ. संदीप भागवत नावाचे देवदूत माझ्या मदतीला धावले आणि माझ्यावर यशस्वी उपचार केले. त्यामुळेच त्यांनी मला नवसंजीवनी दिली,” हे बोल आहेत सोलापूरच्या ऋतिका पार्वतय्या श्रीराम या ख्यातकीर्त आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटूचे.

तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरणातील डायव्हिंगमध्ये १० मीटर हायबोर्ड, १ व ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावताना तिने नवीन विक्रम प्रस्थापित केला. तेव्हा तिच्याशी बातचीत केल्यानंतर तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

न वळणारा हात सहा महिन्यांत ठीकठाक : “शहर, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा सोनेरी प्रवास विनाखंड सुरू होता. मनात पदकांच्या शतकाची खूणगाठ पक्की बांधली होती. अथक परिश्रमानंतर २०१० मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि याच वेळी मला खांदेदुखीने गाठले. उजवा हात वळेनासा झाला. मग दोन वर्षे कसले पोहणे अन् कसले काय! उपचारांना यश येत नव्हते. अशातच राष्ट्रकुल स्पर्धेवेळी माझ्या थेरपी नेहा पिलापकर यांनी माझ्याच गावच्या डॉ. संदीप भागवतांकडे जाण्याचा सल्ला दिला. फिजिओथेरपिस्ट भागवतांनी मे २०१३ मध्ये उपचार सुरू केले आणि अवघ्या सहा महिन्यांत चमत्कार झाला. डॉक्टरांनी माझ्यावर ‘मॅट्रिक्स ऱ्हिदम्स थेरपी’द्वारे मोफत उपचार केले. अथक परिश्रम घेतले. फक्त दहा वेळा एक तासाचे उपचार केले. हळूहळू वेदना कमी होऊ लागल्या. या उपचारांत औषधांव्यतिरिक्त शरीराला कंपने देतात. त्यामुळे पेशींच्या आजूबाजूचे रक्ताभिसरण सुधारले. सोबतीला व्यायामाची जोड होतीच. सांध्याच्या हालचाली पूर्ववत झाल्या. डॉ. भागवतांनी जातीने सरावही पाहिला. उपचारांत यश येत असतानाच आजारामुळे आलेला दुबळेपणा झटकून त्रिवेंद्रममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत ३ रौप्यपदके कमावली. त्यामुळे आत्मविश्वास बळावला आणि तिरुवनंतरपुरम येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही विक्रमांसह तिने सुवर्णपदके पटकावली. उपचारांमुळेच पुन्हा डायव्हिंगकडे वळू शकले. आता आजाराचा लवलेशही कुठे शिल्लक राहिला नाही,” असे ऋतिका सांगते.

-ह‍ीदम्स थेरपी?
जर्मनीत उगम. पूर्ण औषधाविना वापरली जाणारी पद्धती म्हणून प्रसिद्ध. आंतरराष्ट्रीय पातळीवर १० वर्षांपासून वापरली जाते. सोलापूरचे डॉ. संदीप भागवत हे या पद्धतीचे भारतातील प्रमुख प्रशिक्षक आहेत. डॉ. भागवतांनी भारतात २० राज्यात १४ डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे. खेळाडूंबरोबरच इतर रुग्णांनाही ही उपचारपद्धती फायदेशीर आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाचे ध्येय
ऋतिकाचे लग्न येत्या २६ फेब्रुवारीला आहे. लग्नानंतरही फिटनेस ठेवून राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान मिळवून पदक जिंकण्याचे तिचे ध्येय आहे. सहावीत असतानाच तिची राष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. एका वर्षातच आशियाई पातळीवर झेप. या कामगिरीची रेल्वेने दखल घेतली. खेळावर जिवापाड प्रेम करणारी ऋतिका शिक्षणालाही तितकेच महत्त्व देते. वाणिज्यशास्त्रातील पदवी तिने मिळवली आहे. सध्या मुंबईत एम.बी.ए. शिकते.