नवी दिल्ली - इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांशी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भेट घेतली. देशासाठी खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे, अशी प्रशंसा या वेळी त्यांनी केली. भारताने आशियाई स्पर्धेत ११ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. भारताने आठवे स्थान मिळवले होते.
खेळाडूंचे अभिनंदन करताना त्यांनी अशीच ऊर्जा आणि उत्साह भविष्यातही कायम ठेवला तर खेळात आणखी चांगले निकाल येतील, असा विश्वास या वेळी मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय शास्त्रज्ञांचे यश अधोरेखित करताना मोदी यांनी मंगळयान मोहिमेच्या यशाचा दाखला या वेळी दिला. भारतीय खेळाडूंचे यश यापेक्षा कमी नाही, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. या उपस्थित खेळाडूंना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर सल्ला घेण्यासाठी व काही प्रकरणावर चर्चा करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधण्यास सांगितले.
सचिन, मेरी कोमच्या प्रयत्नांची स्तुती :
मोदी यांनी याप्रसंगी खेळाडूंना
आपला खास मित्र असल्याचे म्हटले. खेळाडूंनी मला मित्रच समजावे, असे त्यांनी म्हटले. स्वच्छ भारत अभियानात एमसी मेरी कोम आणि सचिन तेंडुलकर यांच्या प्रयत्नांची या वेळी त्यांनी स्तुती केली. या दोघांनी स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतल्याने शेकडो प्रेरित झाले आणि स्वच्छतेसाठी घराबाहेर पडले. अनेकांनी त्यांचे अनुकरण केले, असे त्यांनी सांगितले.