मुंबई - भारतरत्न सचिन तेंडुलकरचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘प्लेइंग इट माय वे’चे मुंबईत थाटात प्रकाशन झाले. या सोहळ्याप्रसंगी सचिनने
टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियन कोच चॅपेल यांच्यावर सडकून टीका केली. चॅपेलमुळे मी इतका नाराज होतो की, त्याच्यापेक्षा उत्तम तर संघाचे सर्व सीनियर खेळाडू मिळून टीम सांभाळू शकतील, असे मी त्या वेळी म्हटले होते. चॅपेल यांची गरज नाही, असे बोलल्याचे सचिन या वेळी म्हणाला.
या वेळी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सौरव गांगुली,
राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सचिनची पत्नी अंजली आणि मोठा भाऊ अजित यांची उपस्थिती होती. या वेळी सचिन म्हणाला, चॅपेल यांच्या कार्यकाळात भारतीय ड्रेसिंग रूमचे वातावरण बिघडले होते. वातावरण अत्यंत नकारात्मक असायचे. टीम इंडियाच्या प्रदर्शनात घसरणीला येथेच सुरुवात झाली होती, असेही त्याने नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा भोगलेने केले.
सचिन पहिल्या चेंडूचा सामना करीत नव्हता : सौरव गांगुली
सौरव गांगुलीने सचिन झोपेत कसा चालायचा याबाबतच्या आठवणी सांगितल्या. त्याचा रूम पार्टनर असताना जागावे लागायचे. कारण तो रूममध्येही चेंडू पंख्याला बांधून प्रॅक्टिस करायचा. त्यामुळे माझी कायम झोपमोड व्हायची. सचिनसोबत सलामीला खेळताना मलाच नेहमी पहिल्या चेंडूचा सामना करावा लागत असे. पहिला चेंडू खेळणे सचिनला आवडत नसे. पाकविरुद्ध एका लढतीत आम्ही दोघे मैदानावर उतरलो आणि सचिनच्या आधी मीच नॉन स्ट्राइक एंडवर जाऊन उभा झालो. सचिनला त्या वेळी नाइलाजाने स्ट्राइक घ्यावी लागली. बहुदा जगातला मी एकमेव असा कर्णधार होतो, ज्याला
आपल्या खेळाडूला स्ट्राइक घेण्यासाठी आग्रह करावा लागत असे, असेही गांगुलीने नमूद केले.
पुढे वाचा ..... तेंडुलकर्स
‘ती’ बॅट अजूनही सचिनने जपली आहे : अजित
सचिनच्या आयुष्यात दोन व्यक्तींना महत्त्वाचे स्थान आहे. पत्नी अंजली, जिला क्रिकेट या खेळाची जराही आवड नव्हती ती आणि सचिनला क्रिकेटच्या मैदानावर नेऊन त्याच्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणारा भाऊ अजित. या दोघांना हर्षा भोगले यांनी आज बोलते केले. सचिनला रमाकांत आचरेकरांकडे त्यांचा भाऊ अजित सर्वप्रथम घेऊन गेला. सचिनकडे प्रत्येक गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा सामना करायचे उत्तर असायचे. अजित म्हणाला, ‘सचिनची बहीण काश्मीरला गेली होती. तेथून ती काश्मीर विलोची टेनिस बॉल क्रिकेट खेळाची बॅट घेऊन आली होती. सचिनने ती बॅट अजूनही जपून ठेवली आहे. अजित, सचिनच्या आहारावरही नियंत्रण ठेवायचा. सचिन खादाड होता. त्याला नियंत्रणात ठेवण्यावर अजितचा भर होता.
अंजलीने ‘तो’ टी शर्ट अजूनही जपलेला
स्टार क्रिकेट क्लबतर्फे सचिन इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला जायचा. त्या वेळी अंजलीने त्याला प्रथम पाहिले. अंजलीला क्रिकेटची आवड नव्हती. मात्र काका व वडिलांच्या आग्रहास्तव ती नाइलाजाने जायची. त्या वेळीच या दोघांची नजरानजर झाली. भगव्या रंगाचे टी शर्ट घालून आलेली अंजली सचिनच्या स्मृतिपटलावर कायमची राहिली. अंजलीने तो लकी टी शर्ट अजूनही जपून ठेवला आहे. अंजलीला स्वत:च्या घरी पत्रकार म्हणून सचिनने प्रवेश दिला होता. त्याबाबत आठवणी सांगितल्यानंतर अंजलीने सेलिब्रिटी सचिनची पत्नी असल्याचे सुख जगाला दिसते, परंतु दु:ख दिसत नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात अशा मोठ्या व्यक्तीची पत्नी बनून राहणे कठीण असते. मुले लहान असताना सचिनसोबत प्रवास करायची, न्यूझीलंडमध्ये सारा रात्री झोपेतून उठून रडायची. सचिनला त्रास व्हायचा. भारतीय संघ हरला की दु:ख व्हायचे, अशा आठवणी अंजलीने सांगितल्या. अंजली म्हणाली, १९९९ ला इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरू असताना सचिनच्या वडिलांचे निधन झाले. ती बातमी मी कठोर मन करून त्याला सांगितली. त्या वेळी तो कोसळला. तेव्हा एकदाच खचलेला मी त्याला पाहिले होते. सचिनच्या या पुस्तकाने प्रकाशनपूर्व विक्रीचे सर्व उच्चांक आज मोडले.
वातावरण बिघडले होते : लक्ष्मण
ड्रेसिंग रूमचे वातावरण चांगले असले पाहिजे. मात्र, चॅपेल यांच्यामुळे २००६ मध्ये ड्रेसिंग रूमचे वातावरण बिघडले. त्या वेळी मैदानावर जातानासुद्धा डोके शांत नसायचे. खेळातला आनंद संपत होता. या वेळी लक्ष्मणने सचिनच्या फटक्यांचा भाता किती समृद्ध आहे हे विशद करताना ऑस्ट्रेलियात एकदा त्याने कव्हर्समध्ये एकही फटका न मारता धावा काढल्याची आठवण सांगितली. किती धावा काढल्या यापेक्षा त्या धावांचा संघाला किती लाभ झाला हे महत्त्वाचे असते. त्याबाबत सचिनच्या अनेक उपयुक्त डावांची लक्ष्मणने माहिती दिली.
सचिन चांगला मित्र : द्रविड
पाकिस्तान दौ-यात सचिन १९४ धावांवर खेळत असताना भारताचा डाव घोषित केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याबाबत राहुल द्रविडच्या बाजूने सचिनने ‘बॅटिंग’ केली. सचिन म्हणाला, ‘मीडियाने तो एकच प्रसंग लावून धरला. खरं तर असे संघर्षाचे अनेक प्रसंग घडत असतात. राहुल द्रविड म्हणाला, तब्बल १७ वर्षे एकत्र खेळल्यानंतर मतभेदाचे असे क्षण येतातच. आम्ही ते विसरून पुढे जात असतो. त्यानंतर आणि आजही आम्ही चांगले मित्र आहोत.’