आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्कुलमच्या खेळीने न्यूझीलंड सहज विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅमिल्टन - आक्रमक फलंदाजीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या ब्रेंडन मॅक्कुलमच्या स्फोटक 74 धावा आणि जेम्स फ्रँकलिनने घेतलेल्या चार विकेटच्या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडला 55 धावांनी हरवले. या विजयासह न्यूझीलंडने टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. इंग्लंडने पहिला सामना 40 धावांनी जिंकला होता. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शुक्रवारी वेलिंग्टन येथे होईल.

मॅक्कुलमने अवघ्या 38 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने झटपट 74 धावा काढल्या. या आक्रमक खेळीच्या बळावर न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 192 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 19.3 षटकांत 137 धावांत आटोपला. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 54 धावा काढल्या आणि जेस ट्रेडवेलने 22 धावांचे योगदान दिले. किवीज गोलंदाज फ्रँकलिनने शानदार गोलंदाजी करताना 3.3 षटकांत 15 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडचे चार गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक असलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 47 धावांत त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. यानंतरही एकेक गडी बाद होत राहिले.