बारामती - नुकत्याच दक्षिण आिफ्रकेत झालेल्या अंध क्रिकेटपटूूंच्या विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून विजेतेपद पटकावले. ही बाजी मारणा-या अंध क्रिकेट खेळाडूंच्या पाठीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची शाबासकीची थाप पडली. विश्वचषकात चमकदार कामगिरी करणा-या बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडीच्या अमोल कर्चेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी अंध क्रिकेटपटूंसोबत तब्बल अर्धा तास वेळ देत चर्चा केली. त्यांचे प्रश्न समजून घेतले.
विश्वचषकाच्या साखळीत पाककडून दोन वेळा पराभूत झालेल्या भारतीय अंध क्रिकेटपटू संघाने हिशेब चुकता करताना फायनलमध्ये पाकला दणका देत विश्वचषक जिंकले. भारताने ६ गड्यांनी विजय मिळवला. अमोल कर्चेने फायनलमध्ये ८ षटकांत २ िवकेट घेतल्या. तो महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एकमेव अंध खेळाडू आहे. मात्र, राज्य शासनाने
आपल्या कामगिरीकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याची खंतही या वेळी अमोलने व्यक्त केली. हे सर्व आई-वडिलांच्या कष्टामुळे शक्य झाले. आमच्या पालकांमुळेच आम्ही क्रिकेट खेळू शकलो आणि पंतप्रधानांची भेटसुद्धा त्यांच्यामुळेच घडली, अशा शब्दांत अमोलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आई-वडिलांना श्रेय : आई-वडील स्वत: अल्पशिक्षित असताना त्यांनी अंध शाळेत दाखल केले. घरी अठराविश्वे दारिद्र्य. चार अपत्यांपैकी एक मुलगी अंध, तर मुलगादेखील संपूर्ण अंध. फक्त दीड एकर शेती. तरी हार न मानता त्यांनी माझ्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय स्तरावर अंध क्रिकेट संघात खेळत विश्वविजेता बनलो, असे अमोल म्हणाला. जन्मत:च अंध असणा-या अमोलच्या सुप्त गुणांना पुणे येथील अंध विद्यालयात वाव मिळाला.
पूर्ण अंध असताना अमोलने परिस्थितीशी हार न मानता चमकदार कामगिरी केल्यानेच पंतप्रधान मोदींनी त्याचे कौतुक केले. केंद्र शासनाने ५ लाखांचा धनादेशही दिला. महाराष्ट्र शासनाने मात्र देशाची शान वाढवणा-या अमोलकडे ढुंकूनही पाहिले नाही. राज्य शासनाने अंध खेळाडूंकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी बारामतीच्या अमोलने व्यक्त केली.