आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस क्रीडा स्पर्धा : जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद संघ विजेते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येथे सुरू असलेल्या पोलिस परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी बास्केटबॉलमध्ये उस्मानाबादने औरंगाबादला, हॉकीत औरंगाबादने उस्मानाबादला आणि फुटबॉल स्पर्धेत जालना संघाने औरंगाबाद संघावर मात करत विजेतेपद पटकावले. स्पर्धा साई, गोकुळ मैदान, विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर होत आहेत. वैयक्तिक स्पर्धेत अरुण रागुडे, पी.पी.सुलाने, सचिन भुमे, चंद्रकला राठोड यांनी विविध गटांत आपला दबदबा कायम राखला आहे. साई बास्केटबॉल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाने औरंगाबाद ग्रामीण संघाला 1 गुणाने पराभूत केले. विजयी संघातर्फे धनंजय मुंढे, सुनील कोळेकर, मोईज काझी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघातील खेळाडूंचा समन्वय वाखाणण्याजोगा होता. उत्कृष्ट पासिंग, थ्रो, अचूक गोल उस्मानाबादच्या संघाने केले. ग्रामीण संघ तोडीस तोड उत्तर देत केवळ एक गुणाने मागे राहिला. शेवटच्या क्षणी खेळाडूंनी सामन्यावरील पकड हलकी केल्याने त्याचा परिणाम संघ पराभवाच्या छायेत गेला. उस्मानाबादच्या खेळाडूंनी औरंगाबादच्या विजयाचा घास तोंडातून पळवला. हा सामना 43-42 असा अटीतटीचा झाला. जिल्ह्याच्या संघातर्फे समीर पठाण आणि प्रदीप पवार यांनी शानदार खेळ केला.
हॉकीमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्यातील अंतिम सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांचे 5 - 5 गुण होते. स्पर्धेतील गोलच्या सरासरीच्या बळावर औरंगाबादला विजयी घोषित करण्यात आले. विजयी संघातर्फे राहुल बचके आणि वसिम शेखने चांगला खेळ केला. फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जालना संघाने औरंगाबादवर 3-1 च्या गुणफरकाने मात केली. जालन्यातर्फे अमजद पठाण, राजेश, राजा खंडागळे यांनी संघाच्या विजयात भरीव योगदान दिले. उपविजेत्या संघातर्फे स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाºया अबुबकरसह सुनील तळेकर, रामलिंग माळी, विनोद पवार यांची चांगला खेळ केला.
निकाल : 4 बाय 100 रिले औरंगाबाद प्रथम- रफिक शेख, विक्रम जाधव, अरुण रागुडे, रामेश्वर काळे, जालना द्वितीय. 4 बाय 100 अडथळा शर्यत औरंगाबाद प्रथम - ए.आर.पटेल, अरुण रागुडे, सविता जायभाय, चंद्रकला राठोड. 400 मीटर - अरुण रागुडे, एस.आर.गवई, पी.पी. सुलाने, सविता जायभाय. मॅरेथॉन - सचिन भुमे, गणेश लिपणे. 1500 मीटर- अरुण रागुडे, रामेश्वर काळे, चंद्रकला राठोड, पी.पी. सुलाने. आज स्पर्धेचा समारोप - स्पर्धेचा समारोप विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पोलिस अधीक्षक राजकुमार व्हटकर, पोलिस उपअधीक्षक सुरेश पोटे, के.जी. प्रधान यांची उपस्थिती राहणार आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये ताराचंद, अनिल विजेते
सन हेल्थ क्लब येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 50 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिव जसप्रीतसिंग भाटिया, रवींद्रसिंग सत्याल, तुळशीराम गतखणे यांची उपस्थिती होती.
विजेते खेळाडू
56 किलो - ताराचंद घर्डे, गणेश शिंदे, राहुल पगारे. 62 किलो - रवींद्र साळवे, काकासाहेब सोनवणे, राजू साळवे. 69 किलो -अनिल इस्ताळकर, बाबासाहेब थोरात, कैलास बाबूळ. 77 किलो -सुमीत करंजकर, राम शेंडीवाले. 84 किलो - विजय लोखंडे, राजू गुंजाळ. 94 किलो - ए. आर. ब्राह्मणे, आर. एन. सुरे. 110 किलो - राजू वाघ, चंपालाल घुसिंगे, नितीन वाघमारे.