आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत ‘शक्तिप्रदर्शन’ रंगणार; बीसीसीआयची आज तातडीची बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आयपीएल’च्या स्पॉट फिक्सिंगचा गेम आता पूर्णत्वाला आला असून चेन्नईत बीसीसीआयमधील शक्तिप्रदर्शनाचा अंतिम सोहळा रविवारी होणार आहे.


क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवासन हे आपल्या हटवादी भूमिकेपासून किंचित हलले आहेत. त्यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची आणि आपल्या जावयाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत अध्यक्षपदापासून दूर राहण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र, बदल्यात त्यांना आयसीसीवरील भारताचे प्रतिनिधित्व कायम हवे आहे. श्रीनिवासन यांची त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असतानाच त्यांचा विरोधी गटही आक्रमक झाला आहे.
अजय शिर्के आणि संजय जगदाळे यांनी कुणाच्या प्रभावाखाली राजीनामा दिला, हे जगजाहीर आहे. त्याच प्रवृत्तींनी आता आयसीसीमार्फत श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दडपण आणण्यास सुरुवात केली आहे.
श्रीनिवासन स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी बीसीसीआयची आपत्कालीन बैठक चेन्नईत आपल्या बालेकिल्ल्यात आयोजित केली आहे. सदस्यांना 24 तासांचा अवधीदेखील न देता त्यांनी चेन्नईत सर्वांना
पाचारण केले आहे. दूरध्वनीवरून त्यांनी आपल्या माणसांशी संपर्क साधला आहेच.


आपत्कालीन बैठकीची अशी राहील रणनीती!
०श्रीनिवासन यांनी क्रिकेट प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असणा-या जगमोहन दालमिया यांची कुमक मदतीला घेतली आहे.
०माजी अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीनिवासन हटाव मोहिमेसाठी सेनानी म्हणून पंजाबच्या आय. एस. बिंद्रा यांना पुढे केले आहे.
०संजय जगदाळे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंचा आदेश शिरसावंद्य मानला तर अजय शिर्के यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.
०कोषाध्यक्षपदासाठी पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले व कोशाध्यक्षपदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांना विनंती करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
० शशांक मनोहर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची व्यूहरचना आखण्यात येत आहे.
० सिक्किम व मणिपूर हे दोन सहसदस्य असून अन्य 30 पूर्ण सदस्य बैठकीत मतदान करू शकतील.
०श्रीनिवासन यांची उचलबांगडी झाली नाही तर घटनेनुसार अध्यक्षाला स्वत:च्या अधिकारात राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या जागी नवे पदाधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार आहे.