आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराव सामन्यात फिरकीच्या जाळ्यात अडकले कांगारू !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - भारत अ संघाच्या दोन फिरकीपटूंच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम अडकली. राकेश धु्रव (51 धावांत पाच विकेट) आणि जलज सक्सेना (61 धावांत 4 विकेट) यांच्या फिरकीसमोर कांगारूंनी तीनदिवसीय सराव सामन्यात गुडघे टेकले. इतकेच नव्हे तर दौ-यातील दुस-या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला दुय्यम संघाविरुद्ध फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. भारत अ संघाने 451 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 235 धावाच काढता आल्या. यामुळे त्यांना फॉलोऑन मिळाला. तिस-या आणि अखेरच्या दिवशी उर्वरित वेळेत पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात तीन बाद 195 धावा काढल्या होत्या.

गुजरातचा डावखुरा फिरकीपटू राकेश धु्रव आणि मध्य प्रदेशचा ऑफस्पिनर जलज सक्सेनाने प्रभावी गोलंदाजी केली. दोघांनी मिळून पहिल्या डावात 9 गडी बाद केले. दुस-या डावातही दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.ऑस्ट्रेलियासाठी सामन्यात फक्त एकच सुखद घटना घडली. त्यांचा सलामीवीर वॉटसनने दोन्ही डावांत अर्धशतके ठोकताना अनुक्रमे 84 आणि 60 धावा काढल्या.

तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 131 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. हेनरिक्सने 41 चेंडूंत 33 धावा काढल्या. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. वेडने 103 चेंडूंचा सामना करताना दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 44 धावा काढल्या.

फिरकीपटूंसमोर कांगारू अडचणीत
ऑस्ट्रेलियासमोर सर्वात मोठी चिंता फिरकीपटूंसमोर त्यांच्या फलंदाजांचे अपयश ही आहे. डावखुरा फिरकीपटू राकेश धु्रव आणि ऑफस्पिनर जलज सक्सेना यांनी ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्रस्त केले, त्यावरून पाहुण्या टीमसमोर धोक्याची घंटा वाजली आहे. यापूर्वी अध्यक्षीय संघाचा ऑ फस्पिनर परवेज रसूलनेही त्यांच्याविरुद्ध 7 विकेट घेतल्या होत्या.