आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन माहात्म्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅटधारी महारुद्रा, पूर्णरनवान फलंदाजा
रमेशी अंजलीनाथा, रनधूता प्रांजना ।।1।।
विक्रमानी तुझ्या देवा, भरली सर्व दप्तरे
एकहाती काढिली त्वा, अख्तराची लख्तरे।।2।।
कसोटी खेळसी जेव्हा, सारे विक्रम तोडिले
लारासी टाकिले मागे, रनासी तुलना नसे।।3।।
एकदिवसीय सामन्यात, बोलरां धडकी भरे
तयासी तुलना कोठे, पाँटिंग कॅलिस धाकुटे।।4।।
एक्स्प्रेसची होते पॅसेंजर, स्पिनर सरळ होतसे
वॉर्न तो महा बिलंदर, तुजला स्वप्नी पाहतसे।।5।।
वकारे आपटून ऐसा, तुजवर चेंडू सोडिला
नाकावर जाऊन बसता, चेहरा रक्ते माखला ।।6।।
पुढचाच चेंडू झाला, लाँग ऑफला सीमापार
सर्वांसी कळले तेव्हा, हा जरा वेगळा प्रकार ।।7।।
वन डेचा तू राजा, चॅरिटी करितो बरी
ट्वेंटी-20 व कसोटी, धावयंत्र ते चालले ।।8।।
इतकी वर्षे खेळून, तुझी भूक ना भागली
विराट आश्विन रैना, मागती तुझी सावली।।9।।
कधी पाठ वा कोपर दुखता, माकडाहाती कोलिते
सचिन तो सर्वदा शांत, त्याची बॅटच बोलते ।।10।।
तोडले झोडले, फोडले कधी सीमेपार भिरकाविले
सगळ्यांची केलीस शेळी, ते तुझ्यावर गुरकावले।।11।।
कधी कठीणसमय येता, घेशी हाती बॉल तू
मंदाविण्या फटकेबाजा, देशी पटकन ब्रेक-थ्रू ।।12।।
स्लीप-गली-कव्हर, आदी शॉर्ट-लेग समस्तही
जाती सीमेपाशी, आनंदे सचिन दर्शने।।13।।
जिंकविले किती सामने, तरी एक इच्छा उरी
विश्वचषक जिंकून देवा, तीही तू केली पुरी।।14।।
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी
दृढदेहो निसंदेहो, धावसंख्या चंद्रकळागुणे।।15।।
फलंदाजी अग्रगण्यू, मुम्बैकरांसि मंडणू
रनरूपी तू महात्मा, शत शतकधारी तू ।।16।।
इति श्री ऋ ग्वेदकृतं संकटनिसरन नाम सचिनस्तोत्र संपूर्ण।