आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Dixit's Artical On Sachin Tendulkar's Godness

सचिनला देव मानण्यात गैर काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते आणि ही तुलना अनेकांना खटकते. अनेक पाश्चात्त्य टीकाकार यावरून भारताची खिल्ली उडवतात व अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे येथील अर्धविद्याविभूषित त्यांची री ओढतात. भारतीयांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे कोणाला तरी देवत्व दिल्याशिवाय भारतीयाला आधार सापडत नाही, स्वत:मधील खुजेपण दुस-याला देवत्व देऊन ते भरून काढतात असे निरीक्षण मांडले जाते़. सचिनकडे फक्त खेळाडू म्हणून पाहण्याची प्रगल्भता भाबड्या मनोवृत्तीच्या भारतीयांकडे नाही. सचिनवर आंधळे प्रेम करणे ही भारतीयांची आत्मवंचना असते. विज्ञानाशी फारकत घेणा-या खुळचट समजुतींनी भरलेल्या भारतासारख्या देशात याहून वेगळे काही घडू शकत नाही, असा टीकेचा सूर असतो. सचिनच्या निवृत्तीनंतर परदेशी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्येही कुठे स्पष्टपणे तर कुठे अप्रत्यक्षपणे हा सूर उमटलेला दिसतो.
आपल्या देशातील बाबा-बुवांची चलती, राजकारण-समाजकारणाबरोबर अर्थकारणातही असलेले अंधश्रद्धांचे वाढते प्रमाण पाहता ही टीका योग्य वाटते व काही प्रमाणात ती योग्य आहेही. तथापि, सचिन रमेश तेंडुलकर हा त्याला अपवाद आहे. सचिनला देव मानण्यात भारतीय काही गफलत करीत आहेत असे मला वाटत नाही.
पाश्चात्त्यांना तसे वाटते कारण त्यांच्या समाजात रुजलेल्या धार्मिक समजुतीतून ते देव या संकल्पनेकडे पाहतात. पाश्चात्त्यांचा देव वेगळा आहे. तो एका जागी बसून न्यायनिवाडा करणारा आहे. तो सर्वशक्तिमान आहे व कुणीही त्याची बरोबरी करू शकत नाही. स्वत:ला वा अन्य कुणाला ईश्वर मानणे हा धर्मदृष्ट्या घोर अपराध मानला जातो.
भारतीय परंपरेतील देवाची संकल्पना वेगळी आहे. जगात जे जे काही वैभवशाली, समृद्ध व सात्त्विक शक्तीने भरलेले आहे, ती ईश्वराची विभूती आहे, असे सश्रद्ध भारतीय मानतो. तत्त्वज्ञानाच्या प्रांतात शिरले तर शास्त्र व कला यांचा मनोहारी संगम जिथे दिसतो तेथे ईश्वरी शक्तीचे स्थान आहे, असे म्हटले जाते. ही भारतीय संकल्पना लक्षात घेतली तर सचिनला देवत्व का मिळाले ते समजून घेता येते. शास्त्र व कला यांचा मनोहारी संगम सचिनच्या खेळात दिसतो. या संगमाचा मैदानावर होणारा आविष्कार जितका स्तिमित करणारा आहे, तितकेच त्याच्या खेळाचे अंतरंग थक्क करणारे आहेत़ क्रिकेटमधील विज्ञान समजून घेतले तर सचिनच्या फलंदाजीचे सामर्थ्य लक्षात येते आणि मग त्याला देवत्व देण्यात अडचण राहत नाही.
सध्याचे गोलंदाज सरासरीने ताशी ९0 मैल वेगाने चेंडू टाकतात. या वेगाने येणारा चेंडू फक्त 550 मिलिसेकंद इतक्या कमी वेळात फलंदाजाकडे झेपावतो. आपल्यासारख्या सामान्य माणसाला समोर काहीतरी सुरू आहे इतके लक्षात येण्यास 550 मिलिसेकंद लागतात. फक्त लक्षात येण्यास, काय होत आहे ते कळण्यास नव्हे. समोरचा चेंडू कसा आहे, त्याचा वेग काय आहे व त्यावर कोणता फटका मारायचा हे या 550 मिलिसेकंदांत फलंदाजाला ठरवावे लागते. डोळ्यांची पापणी मिटण्यास आपल्याला 150 मिलिसेकंद लागतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजी कठीण का असते हे यावरून लक्षात येईल.
ब्रिटनच्या ससेक्स विश्वविद्यालयातील दोन संशोधकांनी या वेगाची आणखी फोड केली आहे. त्यांनी केलेल्या तपासणीनुसार चेंडूचा अंदाज घेण्यास फलंदाजाला 200 मिलिसेकंद लागतात. पुढील 200 मिलिसेकंदांत तो त्यावरील फटका ठरवतो आणि शेवटच्या 150 मिलिसेकंदांत फटका मारतो. फटका मारताना पाय, डोळे, हात व मान यामध्ये विलक्षण साहचर्य असावे लागते. हे करण्यासाठी खोल एकाग्रता असावी लागते. सचिनच्या एकाग्रतेची तीव्रता जागतिक दर्जाच्या अन्य अनेक फलंदाजांहून खूप जास्त आहे. त्याचे प्रशिक्षकच नव्हे तर श्रेष्ठ गोलंदाजही ही गोष्ट मान्य करतात. त्याचे शरीर तंदुरुस्त असते. फलंदाजीसाठी तो उभा राहिला की त्याच्या शरीराचा बॅलन्स (तोल) पाहण्यासारखा असतो. हा तोल साधल्यामुळे तो शरीर लीलया हवे तसे वळवू शकतो. पण सचिनचे वैशिष्ट्य त्यापुढे आहे. चेंडूची लाइन अँड लेंग्थ क्षणार्धात समजून घेणारा म्हणजेच चेंडू वाचणारा त्याच्यासारखा फलंदाज दुसरा नाही, असे खुद्द शेन वॉर्न म्हणतो. चेंडू वाचण्याची क्रिया खूप जलद होत असल्याने कोणता फटका खेळायचा याचा विचार करण्यास सचिनला इतर फलंदाजांपेक्षा काही अधिक मिलिसेकंद मिळतात. सचिनचे त्यापुढील नैपुण्य असे की तो एकाच वेळी दोन फटक्यांचा विचार करू शकतो. मात्र तो द्विधा मन:स्थितीत सापडत नाही तर दोनातून एकाची विचारपूर्वक निवड करतो. आपण पापण्यांची तीनदा उघडझाप करेपर्यंत त्याने हे सर्व केलेले असते.
चेंडू जलदीने वाचण्याची क्षमता व त्याला साथ देणारे शरीर या दैवी देणग्या आहेत. तशा त्या अन्य काही जणांनाही मिळाल्या. पण सचिनने प्रयत्नपूर्वक, अफाट मेहनत घेत या गुणांचा विस्तार केला. प्रयत्नपूर्वक मानसिक व शारीरिक बल कमावले. शेवटच्या कसोटीतही त्याच्या शरीराची लवचिकता व चेंडू वाचण्याची तत्परता थक्क करणारी होती. आमिर खानकडे अभिनयाच्या क्षेत्रात हेच गुण असल्याने सचिनचा आजचा खेळ त्याने उत्कृष्ट ठरवला. प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेल्या मानसिक बलामुळे सचिनचे चित्त अजिबात विचलित होत नाही. शेन वॉर्न म्हणतो की, सचिन माझा चेंडू सहज वाचतो, पण त्याची मानसिक तटबंदी मला फोडता येत नाही. सचिनसमोर स्ट्रॅटेजी निरुपयोगी ठरतात व दैवावर विसंबून गोलंदाजी करावी लागते, अशी कबुली अ‍ॅलन डोनाल्डने दिली आहे.
सचिनच्या मानसिक ताकदीचा व संयमाचा अनुभव शेन वॉर्नने 2004 मधील ऑस्ट्रेलिया दौ-यात दिला आहे़. या दौ-यात द्विशतक मारण्यापूर्वीच्या पाच डावांत सचिनची कामगिरी खराब झाली होती. कव्हरचे फटके त्याला दगा देत होते. साहजिकच आॅस्ट्रेलियातील गोलंदाज त्याला कव्हरमध्ये टिपण्यासाठी गोलंदाजी करू लागले. कव्हरचे फटके हे वेगाने धावा मिळवण्याचे चांगले साधन असते. पण सचिनने तो मोह टाळला. तब्बल दहा तास तो खेळपट्टीवर होता, पण त्याने कव्हरचा फटका मारला नाही. सचिनच्या या संयमाने वॉर्न भारावून गेला.
सचिनच्या कारकीर्दीत अशी अनेक उदाहरणे सांगता येतात. अन्य खेळाडूंनी ती सांगितली आहेत. सचिनमधील हे गुण ईश्वरी शक्तीचे अंश आहेत असे भारतीय परंपरा मानते. परंतु केवळ त्यामुळे तो देव ठरत नाही. सचिनच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तो त्वेषाने खेळतो, आक्रमक फलंदाजी करतो, पण त्याच्या खेळात खुन्नस नसते. एखादा फटका जमला वा विकेट मिळाली की सचिनच्या चेह-यावर निरागस आनंद उमटतो तो पाहण्यासारखा असतो. खेळ जमल्याचे ते समाधान असते. गाणे जमल्यावर गायकाच्या चेह-यावर उमटते तसे! त्याला पैसा अफाट मिळतो व तो खूप व्यवहारी आहे हे खरे असले तरी खेळपट्टीवरील सचिन हा पैशासाठी खेळत आहे असे वाटत नाही. तो खेळासाठी खेळतो. तेच त्याचे मानधन असते. भारतीय परंपरेनुसार हे दैवी संपत्तीचे लक्षण आहे.
श्री, कीर्ती, वाणी, स्मृती, मेधा, धृती व क्षमा या माझ्या विभूती आहेत असे भगवंतांनी म्हटले आहे.( भगवद्गीता दहावा अध्याय 34 वा श्लोक) बहुसंख्य भारतीयांच्या मनात ही परंपरा अभावितपणे रुजलेली असते. समूहमनाचा तो एक प्रभावी हिस्सा असतो. सचिनच्या खेळात आणि त्याच्या वागण्या-बोलण्यात या प्रत्येक गुणाचे कमीअधिक प्रगटन होते. साहजिकच सश्रद्ध भारतीय माणूस त्याला देव, म्हणजे दैवी गुणांचा अंश अंगी बाळगणारा मानतो. अर्थात अश्रद्ध फक्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहतात. तेही योग्य आहे. कारण सचिनच्या खेळातील दैवी गुण त्यांनाही आनंदच देतात.
संशोधकांची माहिती
ब्रिटनच्या ससेक्स विश्वविद्यालयातील दोन संशोधकांनी या वेगाची आणखी फोड केली आहे. त्यांनी केलेल्या तपासणीनुसार चेंडूचा अंदाज घेण्यास फलंदाजाला 200 मिलिसेकंद लागतात. पुढील 200 मिलिसेकंदांत तो त्यावरील फटका ठरवतो आणि शेवटच्या 150 मिलिसेकंदांत फटका मारतो. फटका मारताना पाय, डोळे, हात व मान यामध्ये विलक्षण साहचर्य असावे लागते.