आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू प्रवीण आमरेंचा सुरेश रैनाला मोलाचा सल्ला!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांच्या सान्निध्यात राहून प्रशिक्षक प्रवीण आमरे बरेच काही शिकले आहेत. भारताचे विद्यमान क्रिकेटपटू त्यांच्याकडून अधूनमधून ‘टिप्स’ घेत असतात. भारताच्या कसोटी संघाबाहेर फेकल्या गेलेल्या ऑस्ट्रलियातील एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी निवड झालेल्या सुरेश रैनाने तीन दिवसांपासून प्रवीण आमरे यांच्याकडून टिप्स घेण्यासाठी मुंबईतच तळ ठोकला आहे.
प्रवीण आमरे यांना दक्षिण आफ्रिकेतील ‘बाऊन्सी’ खेळपट्ट्यांवर क्लब क्रिकेट खेळण्याचा बराच अनुभव आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्ट्यांवर आखूड टप्प्याचे चेंडू कसे खेळायचे याबाबत सुरेश रैनाला प्रवीण आमरे यांचा सल्ला हवा होता.
आमरे यांनी त्याला सांगितले की, फोनवर बोलून तुझ्या कच्च्या दुव्यांवर कसे उपाय सुचवता येणार? मुंबईत आलास तर तुझे कच्चे दुवे कसे दूर करता येतील यावर विचार व उपाययोजना करता येईल. सुरेश रैनानेऑस्ट्रेलिया दौºयावर रवाना होण्याआधी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. गेले दोन दिवस तो मुंबईत आहे. प्रवीण आमरे यांच्यासोबत ‘शॉर्ट बॉल’वर कसे खेळायचे याचे धडे तो घेत आहे.
आमरे यांनी सांगितले, ‘नेटमध्ये आणि प्रत्यक्ष सामन्यात असा दुहेरी सराव त्याच्याकडून करून घेतला. रेल्वेविरुद्ध सामन्यात त्याने 86 धावा फटकावल्या. उद्या, गुरुवारी एम. आर. एफ. संघाविरुद्ध सामन्यात सुरेश रैना खेळणार आहे. त्या वेळीही त्याचे कच्चे दुवे दूर करण्याचा प्रयत्न तो करणार आहे. मी दिलेला सल्ला तो प्रत्यक्षात कितपत अंगीकारतो हेही प्रत्यक्ष सामन्यात पाहता येणार आहे.’
आमरे म्हणाले, ‘एमआयजी क्लब, वांद्रे येथे आम्ही गवत जास्त ठेवून नव्या चेंडूने सुरेश रैनाला उसळते चेंडू खेळायला लावले. त्या वेळी उसळत्या चेंडूच्या वेळची त्याची ‘पोझिशन’ कशी असायला हवी यावर गेले दोन दिवस आम्ही काम करीत होतो.’ उसळता चेंडू खेळताना रैनाच्या पायाची हालचाल कशी होती, त्याच्या हाताची नेमकी पोझिशन कशी असायला हवी, त्यात कोणती सुधारणा व्हायला हवी हे आमरे यांनी दाखवून दिले.
सुरेश रैनाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले स्थान निश्चित केले असले तरीही त्याला कसोटी क्रिकेटमध्ये आपले बस्तान अद्यापि बसवायचे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अढळ स्थान मिळवावे यासाठी रैना प्रयत्नशील आहे. नव्या नियमांमुळे आता 50 षटकांच्या सामन्यात दोन चेंडू सलग वापरले जातात. त्यामुळे चेंडूची लकाकी अखेरपर्यंत कायम असते. रैनाच्या शैलीतील उसळते चेंडू खेळतानाचे दोष मी दाखवून दिले आहेत.’
प्रवीण आमरे, प्रशिक्षक.