आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबाव झेलणारा संघच जिंकेल - अंकित बावणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारपासून सुरू होणा-या कर्नाटकविरुद्ध रणजी फायनलमध्ये जो संघ अधिक दबाव समर्थपणे झेलू शकेल तोच विजय मिळवेल. असे असले तरीही आमचा महाराष्‍ट्र संघ पूर्ण लयीत असून फायनल जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व ओतू, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचा गुणवंत क्रिकेटपटू आणि महाराष्‍ट्र रणजी संघाचा मधल्या फळीचा फलंदाज अंकित बावणेने व्यक्त केली. ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना त्याने ही माहिती दिली.
हैदराबाद येथे येत्या 29 जानेवारी ते 2 फेबु्रवारीदरम्यान रणजी ट्रॉफीची फायनल खेळवली जाणार आहे.
भारतीय संघातील कसोटीपटूंचा भरणा असलेल्या बलाढ्य मुंबई संघाला पराभूत केल्याने महाराष्‍ट्राचा आत्मविश्वास वाढला आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला आपण 20 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास घडवू शकतो, असा विश्वास वाटतो. आता आमच्या प्रत्येकात वेगळाच जोश आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. आमचे सर्व खेळाडू पहिल्या सामन्यापासून उत्कृष्ट प्रदर्शन करत असल्याने आता परिपूर्ण युवा संघ तयार झाला आहे, असेही अंकितने नमूद केले.
कर्नाटक चांगला संघ आहे. अंतिम सामना असला तरी आम्ही काही खास रणनीती तयार केलेली नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडू. आमचा कर्णधार रोहित मोटवाणी शांत स्वभावाचा कर्णधार आहे. त्याला सर्वजण सहकार्य करतात. केदार जाधव, हर्षद खडीवाले, रोहित मोटवाणी, विजय झोल हे जबरदस्त फॉर्मात आहेत. आमच्या सर्वच फलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले. फलंदाजी हेच आमचे शक्तिस्थान असून त्यांच्यावर संघाची मदार आहे, असे औरंगाबादच्या अंकितने म्हटले.
कर्नाटकविरुद्ध 2 शतके
अंकितने कर्नाटकविरुद्ध रणजीत आतापर्यंत 2 शतके झळकावली आहेत. त्याने प्रथम श्रेणीत एकूण 8 शतके ठोकली आहेत. अंकितने आपल्या कर्नाटकविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत 2007 मध्ये पहिले शतक ठोकले. त्यानंतर 1 जानेवारी 2012 मध्ये दुसरे शतक केले. त्याची कर्नाटकविरुद्ध चांगली कामगिरी असल्याने तो संघाचा हुकमी एक्का ठरू शकतो.