आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेरी पलटणची झुंज पुन्हा एकदा अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दबंग दिल्लीने पुणेरी पलटणचा अतिशय चुरशीच्या सामन्यात 35-31 असा 4 गुणांनी पराभव करून प्रो-कबड्डी स्पध्रेच्या साखळी स्पध्रेत आगेकूच केली. शनिवारी बंगळुरू बुल्सकडून पराभूत होणार्‍या दिल्लीचा पहिला विजय होता. दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार चढाईबहाद्दर काशिलिंग अडके हा होता. नीलेश शिंदेच्या पकडी दिल्लीच्या विजयाला हातभार लावणार्‍या ठरल्या.
पूर्वार्धात 22-15 अशी आघाडी घेणार्‍या दिल्लीला पुणेरी पलटणने उत्तरार्धात मात्र जबरदस्त टक्कर दिली. जितेश जोशी या क्षेत्ररक्षणातील वाकबगार खेळाडूच्या चढाया उत्तरार्धात फलदायी ठरल्या. त्याने चढाईत एकूण 8 गुण मिळवून दिले. त्याला कप्तान वझीरसिंगची तोलामोलाची साथ लाभली. पुण्याने दिल्लीवर लोण चढवल्यानंतर मात्र गुणफलकात सतत 1 ते 3 गुणांचेच अंतर कायम राहिले. 29-30 अशा गुणफलकानंतर पुण्याने 30-32 वर दिल्लीला रोखले होते. मात्र बोनस गुणाचा लाभ त्या वेळी दिल्लीच्या चढाईबहाद्दरांनी घेतला. दिल्लीने मग वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले व पुणेरी पलटणला शेवटच्या 4 मिनिटांत अवघ्या 2 गुणांचीच कमाई करता आली. त्यामुळे दिल्लीला 35-31 असा सामना जिंकता आला.

युमुम्बा-तेलगू टायटन्स टाय
सोमवारचा दुसरा सामना युमुम्बा आणि तेलगू टायटन्स यांच्यात होता. हा सामना 35-35 अशा गुणांवर टाय झाला. सामन्याच्या अखेरच्या मिनिटात युमुम्बाचा संघ 3 गुणांनी आघाडीवर होता. मात्र, टायटन्सच्या रूपेशकुमारने अखेरच्या मिनिटात तीन गडी बाद केल्याने सामना 35-35 असा बरोबरीत सुटला.