आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League: Delhi Ends Home Run With A Victory

प्रो-कबड्डी लीग दिल्लीत ‘दिल्ली’च दबंग !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीने प्रो-कबड्डी लीगमध्ये दबंग कामगिरी केली. पाहुण्या बंगाल वॉरियर्सचा एकतर्फी पराभव केला. चाहत्यांच्या भरघोस पाठिंब्याच्या बळावर आधीच्या पराभवाचे शल्य झुगारत खेळाडू कात टाकल्यासारखे खेळले. दिल्ली 46 विरुद्ध 36 अशा फरकाने जिंकली. दिल्लीचा सात लढतीतील हा दुसरा विजय ठरला. दिल्ली 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या, तर बंगाल वॉरियर्स 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

दिल्लीचे त्यागराज स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. प्रेक्षकांच्या जोरकस पाठिंब्यामुळे खेळाडूंना हत्तीचे बळ आल्याचा भास होत होता. मराठमोळा काशीलिंग आडके स्टार रायडर, तर रवींद्र सिंग बेस्ट डिफेंडर ठरला. या दोघांनी वॉरियर्सच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. बंगालच्या नतिनी मदानेने सर्वाधिक गुण खेचून आणले, मात्र इतर खेळाडूंनी निराशा केली.

याआधीच्या सामन्यात दोन्ही संघांच्या पदरी पराभव पडला होता. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याचीच उत्सुकता लागली होती. अखेर दिल्लीने बाजी मारली. कोलकात्यात युमुम्बाविरुद्ध बंगालला पराभव स्वीकारावा लागला होता. हा दबाव या सामन्यातही स्पष्ट दिसत होता. दिल्लीने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. पहिल्या दहा मिनिटांतच त्यांनी 11-4 अशी जोरदार आघाडी घेतली होती. दुसरीकडे बंगालच्या विजयासाठी कोरियन जंग कून ली आणि नतिनी मदानेने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र सुरजित नरवाल आणि आडकेने आक्रमणाची धार अधिकच तीव्र करून दबाव वाढवला. दिल्लीने पहिल्या सत्रात 27 - 12 अशी आघाडी घेतली होती.

सुरुवातच दणक्यात केल्यामुळे दिल्लीचे इरादे बुलंद झाले होते. हीच लय त्यांनी दुसर्‍या सत्रातही कायम ठेवून विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयामुळे दिल्लीचे मनोबल उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. हीच लय त्यांना कायम राखता आली तर पुढच्या सामन्यात विजय मिळवणे सुकर होईल.