आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: लढवय्ये इंडियन्स, फुसके वॉरियर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई इंडियन्सने पुणे वॉरियर्सला 5 विकेटने पराभूत करून आयपीएल-6 च्या प्ले आॅफसाठी आपला दावा मजबूत केला आहे. मिशेल जॉन्सनची (4 षटके, 8 धावा, 2 विकेट) दमदार गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या (37) कॅप्टन्स इनिंगमुळे मुंबईने सहज विजय मिळवला. पुण्याला 8 बाद 112 धावांच्या स्कोअरवर रोखल्यानंतर मुंबईने 18.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 116 धावा काढून सहज विजय मिळवला.
धावांचा पाठलाग करताना रोहितने अंबाती रायडूसोबत (26) चौथ्या विकेटसाठी 8.4 षटकांत 54 धावांची मॅच विजयी भागीदारी केली. मुंबईचा हा 13 सामन्यांत नववा विजय ठरला आहे. मुंबईच्या नावे आता 18 गुण झाले आहेत. दुसरीकडे पुणे वॉरियर्सचा हा 14 सामन्यांत 12 वा पराभव ठरला. विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज असताना रोहित बाद झाला. मात्र, त्याच्या 41 चेंडूंतील तीन चौकारांच्या मदतीने 37 धावांच्या खेळीने मुंबईचे काम सोपे केले होते. मुंबईकडून अंबाती रायडूने 23 चेंडूंत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 23 धावा काढल्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर डेवेन स्मिथ भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाला. त्याला पहिल्याच चेंडूवर अशोक डिंडाने त्रिफळाचीत केले. यानंतर सचिन तेंडुलकर (15) आणि दिनेश कार्तिक (17) यांनी दुसर्‍या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. सचिनला मेंडिसने बाद केले, तर कार्तिकचा अडथळा युवराजने दूर केला. रोहित व रायडूने डाव सावरला. मुंबईने या लढतीत पोलार्डच्या जागी ऑट्रेलियाचा युवा ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली. मॅक्सवेलने 7 चेंडूंत 1 षटकार व एका चौकारासह नाबाद 13 धावा काढल्या. हरभजन 4 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पुण्याला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. पुण्याकडून युवराजसिंगने सर्वाधिक 33 धावा काढल्या. युवराजने 29 चेंडूंत 2 षटकार व एका चौकारासह ही खेळी केली. मनीष पांडेने 29 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज या वेळीही अपयशी ठरले. अंबाती रायडू (11), अ‍ॅरोन फिंच (10), अँग्लो मॅथ्यूज (0), अभिषेक नायर (11), रिचर्डसन (8) या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. मुंबईकडून मिशेल जॉन्सनने 4 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 8 धावांत 2 विकेट घेतल्या. याशिवाय ए. अहेमद,
लेसिथ मलिंगा यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. हरभजनने एकाला टिपले.

अखेर मॅक्सवेलला मिळाली संधी
आयपीएल-6 च्या बोलीत मिलियन डॉलर बेबी (10 लक्ष डॉलर) असलेला ऑट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलला अखेर या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. केरोन पोलार्ड जखमी झाल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले. त्याने नाबाद 13 धावा काढल्या. याशिवाय एक षटक गोलंदाजी करताना 5 धावा दिल्या.

संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : 8/112 (युवराज 33, मनीष पांडे 29, 2/8 जॉन्सन, 2/27 मलिंगा), मुंबई इंडियन्स : 18.5 षटकांत 5/116 (रोहित शर्मा 37, अंबाती रायडू 26, 2/35 डिंडा), सामनावीर : मिशेल जॉन्सन.