आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: पंजाबची पुण्यावर मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - डेव्हिड मिलरने (नाबाद 80) पुणे वॉरियर्सच्या हाता तोंडाशी आलेला खास पळवला. अखेरच्या 6 चेंडूंत विजयासाठी 16 धावांची गरज असताना मिलरने एक चेंडू शिल्लक ठेवून रोमांचक विजय मिळवून दिला. युवा खेळाडू मनदीपने नाबाद 77 धावा ठोकून त्याला चांगली साथ दिली. पुण्याने दिलेले 186 धावांचे लक्ष्य पंजाबने एक चेंडू आणि 7 विकेट शिल्लक ठेवून गाठले.


धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार गिलख्रिस्ट (4), अझहर मेहमूद (0) आणि मनन वोहरा (22) हे खेळाडू लवकर बाद झाले. यानंतर मनदीप आणि मिलरने नाबाद 128 धावांची भागीदारी करून विजयश्री गाठली. मिलरने 41 चेंडूंत 5 षटकार आणि 5 चौकार ठोकत नाबाद 80 धावा चोपल्या. मनदीपने 58 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 77 धावा काढल्या.


फिंचचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी पुणे वॉरियर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले. पाहुण्या संघाकडून कर्णधार अ‍ॅरोन फिंचने सर्वाधिक 65 धावा काढल्या. त्याच्यासह इंग्लिश ऑलराउंडर ल्यूक राइटने अवघ्या 10 चेंडूंत 34 धावा ठोकल्या.
पीसीए मोहालीत प्रथम फलंदाजी करताना पुणे वॉरियर्सने शानदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरोन फिंचने रॉबिन उथप्पासोबत (37) पहिल्या विकेटसाठी 83 धावांची सलामी दिली. पंजाबला 11 व्या षटकात पहिले यश मिळाले. अवानाने उथप्पाला कर्णधार अ‍ॅडम गिलख्र्रिस्टने झेलबाद केले.


ल्यूक ठरला ‘राइट’ चॉइस
युवराजसिंग (34) आणि ल्यूक राइटने (34) अखेरच्या काही षटकांत आक्रमक फलंदाजी केली. या बळावरच पुण्याने 4 बाद 185 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. फलंदाजीला येताच राइटने चौकारांची आतषबाजी सुरू केली. त्याने 18 व्या षटकात अझहर मेहमूदच्या चार चेंडूवर सलग चौकार मारले. यानंतर पुढच्या षटकात प्रवीणकुमारलाही त्याने सलग दोन चौकार मारले. एकवेळ राइटच्या नावे सहा चेंडूत 24 धावा असा स्कोअर होता.


मॅथ्यूजला बाहेर बसवले
पुणे वॉरियर्सने सध्या फॉर्मात नसलेला आपला कर्णधार अँग्लो मॅथ्यूजला संघाबाहेर केले. त्याच्या जागी फिंचने नेतृत्व केले. चेन्नई येथे झालेल्या एका सामन्यात मॅथ्यूजच्या जागी रॉस टेलर कर्णधार होता. मात्र, यावेळी मॅथ्यूजसह टेलरलाही संघाबाहेर करताना फॉर्मात असलेल्या आणि कामगिरीच्या बळावर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणा-या फिंचकडे व्यवस्थापनाने नेतृत्व देण्याचा धाडसी निर्णय घेतला.


संक्षिप्त स्कोअर : पुणे वॉरियर्स 4/185 (फिंच 65, युवराज 34, ल्यूक राइट 34, उथप्पा 37). किंग्ज इलेव्हन पंजाब 3/186 (मिलर नाबाद 80, मनदीप नाबाद 77)