आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Warriors Vs Sunrisers Hyderabad Team IPL 6 Live Cricket

IPL: अमित मिश्राच्या गुगलीने पुणे चीत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उजव्या हाताचा लेगस्पिनर आणि प्लेअर ऑफ द मॅच अमित मिश्राच्या कारकीर्दीतील तिस-या हॅट्ट्रिकच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने पुणे वॉरियर्सला 11 धावांनी नमवले. अमितने एकाच षटकाच्या पाच चेंडूंत चार गडी बाद केले. आयपीएलमध्ये त्याने यापूर्वी 2008 आणि 2011 मध्ये हॅट्ट्रिक केली होती. आयपीएलमध्ये तीन वेळा हॅट्ट्रिक करणारा अमित पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. अमितने फलंदाजीतसुद्धा 30 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 119 धावा काढल्या. प्रत्युत्तरात पुण्याची टीम 108 धावांत ढेपाळली.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात एक वेळ पुणे वॉरियर्स 5 बाद 101 धावा अशा स्थितीत होती. पुण्याचा विजय दृष्टिपथात होता. मात्र, कर्णधार अँग्लो मॅथ्यूज, अभिषेक नायर, भुवनेश्वरकुमार, अशोक डिंडा आणि राहुल शर्मा यांनी निराशा केली. अमित मिश्राने आपल्या गुगली चेंडूच्या जाळ्यात फलंदाजांना अडकवून पुण्याच्या आशेवर पाणी फेरले. कर्णधार मॅथ्यूजने टिकून खेळण्याऐवजी षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि 20 धावा काढून बाद झाला. पुण्याकडून रॉबिन उथप्पाने सर्वाधिक 22 धावा काढल्या.

तत्पूर्वी, टॉस जिंकून पुणे वॉरियर्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भुवनेश्वरकुमारच्या (18 धावांत 3 विकेट) स्विंग गोलंदाजीच्या बळावर पुणे वॉरियर्सने सनरायझर्स हैदराबादला 8 बाद 119 धावांच्या सामान्य स्कोअरवर रोखले.

भुवनेश्वरने जोरदार कामगिरी करताना हैदराबादच्या फलंदाजांना त्रस्त केले. त्याने पार्थिव पटेल (12), कर्णधार कॅमरून व्हाइट (0) आणि युवा फलंदाज हनुमा विहारी (1) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सलामीवीर किंटन डी कॉकला (2) अशोक डिंडाने बाद केले.

अमितने फलंदाजीतही दिले योगदान
हैदराबादने आपल्या चार विकेट अवघ्या 17 धावांत गमावल्या. यानंतर पाचव्या क्रमांकाचा फलंदाज विप्लव सामंत्रेने अवघ्या 37 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 37 धावा काढल्या. 15 व्या षटकात तो बाद झाला त्या वेळी हैदराबादचा स्कोअर 7 बाद 75 असा होता. टीम संकटात असताना अमित मिश्रा (30) आणि आशिष रेड्डी (नाबाद 19) यांनी आठव्या विकेटसाठी 4.1 षटकांत 40 धावा जोडून हैदराबादला शंभराच्या पुढे पोहोचवले.

भुवनेश्वरच्या 3 विकेट
हैदराबादने अखेरच्या पाच षटकांत 44 धावा काढल्या. मात्र, यापूर्वीच्या दहा षटकांत त्यांना फक्त 42 धावा काढता आल्या. पुणेकडून भुवनेश्वरने 18 धावांत 3, राहुल शर्माने 21 धावांत 2, अशोक डिंडाने 25 धावांत एक, तर मिशेल मार्शने 26 धावांत एक विकेट घेतली.