आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PV Sindhu, Kidambi Srikanth Reach Singapore Open Quarterfinals

संगापूर ओपन सुपर सिरीज : श्रीकांत उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - भारताचा स्टार युवा खेळाडू के. श्रीकांतने सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेली सिंधू आणि साईप्रणीतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच तिसर्‍या मानांकित रत्नाचोक इतानोनलाही पराभवाचा सामना करावा लागला. तिला चीनच्या ली हानने 17-21, 21-14, 21-19 ने पराभूत केले.

थायलंड ओपन चॅम्पियन के. श्रीकांतने विजयी मोहीम कायम ठेवताना उपांत्यपूर्व सामना जिंकला. त्याने हॉँगकॉँगच्या यून हूला रंगतदार लढतीत पराभूत केले. भारताच्या खेळाडूने 17-21, 21-14, 21-19 अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. यासह त्याने अंतिम चारमधील स्थान निश्चित केले. श्रीकांतने वेगवान खेळी करताना 63 मिनिटांत विजय मिळवला.

पहिल्या गेममधील अपयशातून सावरलेल्या श्रीकांतने दुसर्‍या व निर्णायक तिसर्‍या गेममध्ये बाजी मारली. इंडोनेशियाच्या यूनने दमदार सुरुवात करताना 21-17 ने पहिला गेम आपल्या नावे केला. त्यानंतर मात्र, त्याचा दुसर्‍या गेममध्ये निभाव लागला नाही. भारताच्या खेळाडूने 21-14 ने दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर त्याने तिसर्‍या गेममध्येही विजयाचा कित्ता गिरवला. त्याने सुरेख खेळी करताना तिसरा गेम 21-19 ने जिंकून युन हूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

सिंधूची 37 मिनिटांची झुंज ठरली अपयशी
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या सिंधूची उपांत्यपूर्व लढतीतील झुंज अपयशी ठरली. तिला दुसर्‍या मानांकित यिहान वांगने सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. चीनच्या वांगने लढतीत 21-19, 21-15 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह तिने अवघ्या 37 मिनिटांत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. आठव्या मानांकित सिंधूने पहिल्या गेममध्ये शर्थीची झुंज देताना वांगला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवघ्या दोन गुणांच्या आघाडीने वांगने बाजी मारली. त्यानंतर वांगने आपला दबदबा कायम ठेवताना दुसरा गेमही आपल्या नावे केला.

साईप्रणीत बाहेर
पाचव्या मानांकित पेग्यू डुने भारताच्या साईप्रणीत बीचा पराभव केला. त्याने अवघ्या 39 मिनिटांत 21-15, 21-15 ने सामना जिंकला. यासह साईप्रणीतला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

ली चोंग वेई विजयी मोहीम कायम
जगातील नंबर वन ली चोंग वेईने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत थायलंडच्या तानोन्गसाक बुनसुकवर मात केली. त्याने 21-8, 21-14 ने सामना जिंकला. मलेशियाच्या वेईने 30 मिनिटांत वेगवान खेळी करून सामना आपल्या नावे केला.