पॅरिस - जगातील नंबर वन
राफेल नदालने रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नवव्यांदा पुरुष एकेरीच्या किताबावर नाव कोरले. त्याने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या नोवाक योकोविकचा पराभव केला. अव्वल मानांकित नदालने 3-6, 7-5, 6-2, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याला तब्बल तीन तास 31 मिनिटे झुंज द्यावी लागली. पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना नदालने अंतिम सामना आपल्या नावे केला. त्याने लढतीत ेतीन ऐस आणि 44 विनर्स मारून सामना जिंकला. या वेळी सर्बियाच्या नोवाक योकोविकला दुसर्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी, त्याने 2012 मध्येही अंतिम फेरी गाठली होती. मात्र,त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
योकोविकने 44 मिनिटांत पहिला सेट जिंकून दमदार सुरुवात केली. त्यानंतर नदालने लढतीत दमदार पुनरागमन केले. त्याने तब्बल 60 मिनिटे झुंज देत टायब्रेकरपर्र्यंत रंगलेला दुसरा सेट आपल्या नावे केला. याशिवाय त्याने लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर त्याने तिसर्या सेटमध्येही बाजी मारली. त्याने 50 मिनिटांत हा सेट जिंकून आघाडी घेतली. दरम्यान, 57 मिनिटे रंगलेल्या चौथ्या सेटमध्ये योकोविकने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, नदालने त्याचे डावपेच हाणून पाडले व चौथा सेट जिंकत विजेतेपद आपल्या नावे केले.
सलग पाचवा किताब
स्पेनच्या राफेल नदालने सलग पाचव्यांदा फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्याने 2005 पासून या स्पर्धेचा किताब जिंकण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेला 2009 मध्ये ब्रेक लागला. त्यानंतर त्याने पुन्हा 2010 मध्ये सुरूकेलेली ही मोहीम सलग पाचवा किताब जिंकूनही कायम ठेवली. त्याने करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 14 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
रॉजर- ज्युलियन दुहेरीचे विजेते
फ्रान्सच्या ज्युलियन बेनेटेक्यू आणि एडवर्ड रॉजर वेस्लिनने रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब पटकावला. या 11 व्या मानांकित जोडीने अंतिम सामन्यात स्पेनच्या मार्सेल ग्रानोलर्स आणि मार्स लोपेझचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. फ्रान्सच्या जोडीने 6-3, 7-5 अशा फरकाने सामना जिंकत पुरूष दुहेरीच्या विजेतेपदावर नाव आपले कोरले.
हॅन्स-पेंग महिला गटात चॅम्पियन
सु-वेई हॅन्स आणि शुआई पेंग या अव्वल मानांकित जोडीने फ्रेंच ओपनच्या महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. तैपेईच्या या जोडीने अंतिम सामन्यात दुसर्या मानांकित सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सीचा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने 6-4, 6-1 ने सामना जिंकला. या जोडीने एक तास 14 मिनिटांमध्ये दुहेरीची ट्रॉफी पटकावली.