आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नडाल फायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- सात वेळचा विजेता राफेल नदालने शुक्रवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये दिमाखदारपणे प्रवेश केला. यासह त्याने सर्बियाच्या नोवाक योकोविकचे करिअर ग्रॅँडस्लॅम करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. चार तासापर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत नदालने 6-4, 3-6, 6-1, 6-7, 9-7 अशा फरकाने विजय मिळवला. दोन्ही खेळाडूंनी उपांत्य लढतीत उल्लेखनीय खेळी करून उपस्थितांची मने जिंकली. डेव्हिड फेरर व राफेल नदाल यांच्यात फायनल होणार आहे.

तिसर्‍या मानांकित नदालने लढतीत विजय मिळवून योकोविकला मोंटे कार्र्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. याशिवाय स्पेनच्या खेळाडूने आठव्यांदा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने लढतीत 61 विनर्स मारले. त्याने पहिला सेट 51 मिनिटांत जिंकून दमदार सुरुवात केली. मात्र, योकोविकने 49 मिनिटांत दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी मिळवली. त्यानंतर 37 मिनिटांत स्पेनच्या खेळाडूने तिसरा सेट जिंकून आघाडी मिळवली. मात्र, चौथ्या सेटमध्ये योकोविकने बाजी मारून पुन्हा बरोबरी मिळवली. अखेर, 82 मिनिटांच्या रंगतदार पाचव्या निर्णायक सेटमध्ये नदालने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेव्हिड फेरर अंतिम फेरीत
चौथ्या मानांकित डेव्हिड फेररने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याने उपांत्य फेरीत ज्यो विल्फ्रेंड त्सोंगावर 6-1, 7-6, 6-2 ने विजय मिळवला.

शारापोवा-सेरेना फायनलमध्ये भिडणार
जगातील दोन अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स व मारिया शारापोवा यांच्यात शनिवारी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीची फायनल रंगणार आहे. जगातील नंबर वन सेरेना फ्रेंच ओपन किताबाचे लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेली रशियाची मारिया शारापोवा किताबासह अव्वल स्थान गाठण्याच्या प्रतीक्षेत आहे. अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने उपांत्य लढतीत इटलीच्या सारा इराणीला धूळ चारली. तिने 6-0, 6-1 अशा फरकाने पाचव्या मानांकित सारावर मात केली. तिने या लढतीत सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. तसेच मारिया शारापोवाने व्हिक्टोरिया अझारेंकाचा पराभव केला.