आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahi Sarnobat Gives Full Credit Of Her Success To Her Coach

वर्ल्ड चॅम्पियन राहीने यशाचे श्रेय दिले प्रशिक्षकांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राच्या अंजली भागवतने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एअर रायफलचे सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर महाराष्ट्राची राही सरनोबत हिने स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावून वर्ल्ड चॅम्पियनशिप शूटिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावणारी दुसरी भारतीय महिला होण्याचा बहुमान मिळवला आहे. आज मुंबईत पत्रकारांशी वार्तालाप करताना तिने आपल्या या देदीप्यमान यशाचे श्रेय आपले युक्रोनियन प्रशिक्षक पिडुब्नी यांना दिले आहे. ती म्हणाली, ‘पिडुब्नी यांनी माझी तयारी चांगली करून घेतल्यामुळेच मला हे यश मिळाले.’

कोरियामधील चँगवॉन येथे झालेल्या स्पर्धेत यजमान देशाच्या खेळाडूंना प्रचंड पाठिंबा होता, ती गोष्ट मी गृहीतही धरली होती. त्याचबरोबर अंतिम फेरीत कोरियन प्रेक्षक मी विजेती झाल्यानंतर माझ्यासाठीही टाळ्या वाजवतील हेही मला ठाऊक होते. त्यामुळे शेवटच्या दोन फेर्‍यांपर्यंत आमची गुणसंख्या सारखी असूनही माझ्यावर दडपण आले नव्हते. अंतिम फेरीत मी आघाडी घ्यायची आणि कोरियन खेळाडू मला गाठायची असेच चालले होते.

एकच ‘लक्ष्य’ ठेवण्याचा सल्ला - बाम
राही वेगवेगळे विचार घेऊनच स्पर्धेत उतरायची. या विचारामुळे तिचा गोंधळ उडायचा. मात्र, मी तिला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. आपण सुवर्णपदक जिंकू, असा आत्मविश्वास मनात बाळगण्यास सांगितले होते.’ असे राहीची मानसिक सक्षमता वाढवणारे प्रशिक्षक भीष्मराज बाम म्हणाले.

राहीचा यथोचित सत्कार -वळवी
‘मुख्यमंत्र्यांशी राहीच्या सत्काराबाबत चर्चा केली आहे. लवकरच कॅबिनेटसमोर तिच्या सत्काराचा व रोख रक्कम पुरस्काराचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे,’ असे क्रीडामंत्री पद्माकर वळवी म्हणाले.