आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॉट फिक्सिंग: शिल्पा शेट्टीच्या पती राज कुंद्राचीही चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बुधवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा यांची सहा तास चौकशी केली. त्यांना यानंतरही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

दिल्ली पोलिसांच्या निर्देशांनंतर राज कुंद्रा लोधी रोडस्थित स्पेशल ब्रँचच्या कार्यालयात हजर झाले. पोलिसांनी येथे राज यांचे मित्र उमेश गोयंका यांनाही बोलावले होते. यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ त्रिवेदीलाही आणत तिघांना समोरासमोर बसवून प्रश्न-उत्तरे विचारली. या प्रकरणात त्रिवेदी आणि गोयंका सरकारी साक्षीदार आहेत. गोयंकाचे कुंद्रांसोबत व्यावसायिक हितसंबंध आहेत. कुंद्रांकडे राजस्थान रॉयल्सचे 11.7 टक्के शेअर्स आहेत. कोणत्याही खेळाडूने स्पॉट फिक्सिंग बाबतीत सांगितले नसल्याचे कुंद्रांनी चौकशीत स्पष्ट केले. पोलिसांनी मात्र त्यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.

दस्तऐवज मागितले : पोलिसांनी बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे व आयपीएल सीईओ सुंदर रामन यांच्याकडून त्रिपक्षीय कराराची माहिती मागितली. हा करार बीसीसीआय, आयपीएल फ्रॅँचायझी आणि खेळाडूंदरम्यान झाला होता.

श्रीसंतच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा तपास : दिल्ली पोलिस श्रीसंतच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा कसोशीने तपास करत आहे. श्रीसंत एका डान्स शोमध्ये भाग घेण्यासाठी दुबईला गेला होता. येथे अंडरवर्ल्डमधील एखाद्यासोबत त्याची भेट झाली की नाही, याचाही माग काढला जात आहे.

गुरुनाथ मयप्पन, विंदूविरोधात पोलिसांकडे पुरेसे पुरावे नाहीत
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारासिंग, चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा चेअरमन गुरुनाथ मयप्पन व इतर सहा जणांविरोधात दाखल फसवणूक आणि धोकेबाजीच्या गुन्ह्यांत पुरेसे पुरावे नसल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे मत स्थानिक न्यायालयाने बुधवारी नोंदवले. तसेच अशा पद्धतीच्या गुन्ह्यांतच जामीन मिळण्याची शक्यता नसते. पोलिसांनी फसवणूक आणि धोकेबाजीचे गुन्हे दाखल केले. मात्र, त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे गोळा केले नाहीत. मयप्पनचा मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंगशी सरळ संबंध नव्हता. त्याची केवळ विंदूशी ओळख होती, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.