आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Royals Decides To Bowl First Against CSK

IPL: रॉयल्सने रोखली चेन्नई एक्स्प्रेस !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - सामनावीर शेन वॉटसन (70 धावा, 34 चेंडू, 6 षटकार, 6 चौकार) आणि स्टुअर्ट बिन्नी (41 धावा, 23 चेंडू, 3 षटकार, 2 चौकार) यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जची घोडदौड रोखली. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या लढतीत राजस्थानने 5 गड्यांनी विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 141 धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 17.1 षटकांत 5 बाद 144 धावा काढल्या. या विजयासह राजस्थानने 20 गुणांसह प्ले ऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले. राजस्थानचा हा 14 सामन्यांत दहावा विजय ठरला. चेन्नईच्या नावेसुद्धा 14 सामन्यांत 10 विजय, 20 गुण आहेत.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे (9), जेम्स फुल्कनर (1) आणि संजू सॅमसन (0) हे खेळाडू लवकर बाद झाले. कर्णधार द्रविडने 28 चेंडूंत 2 चौकारांसह 22 धावा काढल्या.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार द्रविडने घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मायकेल हसी (40) व मुरली विजय (55) यांनी चेन्नईला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 83 धावांची भागीदारी केली. स्टुअर्ट बिन्नीने हसीला त्रिफळाचीत केले. हसीने 40 चेंडूंत सहा चौकारांसह 40 धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ चेन्नईची ‘रनमशीन’ सुरेश रैना (1) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (2) आल्यापावलीच तंबूत परतले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या जडेजाने विजयसह चौथ्या गड्यासाठी 24 धावांची भागीदारी केली. दरम्यान, मुरली विजयने 50 चेंडूंत सहा चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. ते धावाबाद झाला. जडेजा व डी. ब्राव्हो या दोघांनी अभेद्य 28 धावांची भागीदारी करून चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. जडेजाने 14 चेंडूंत 12 आणि ब्राव्होने 11 चेंडूंत चार चौकारांसह नाबाद 23 धावा काढल्या.

वॉटसन-बिन्नीची भागीदारी
राजस्थानची टीम 4 बाद 45 अशी संकटात सापडली असताना वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी तुफानी फलंदाजी करून सामन्याचे चित्र बदलले. दोघांनी 45 चेंडूंत 93 धावांची भागीदारी केली.

साक्षीसह शिल्पाने लक्ष वेधले
सवाई मानसिंग स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी आणि राजस्थान रॉयल्सची मालकीण व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या उपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधले. दोघींनी बराच वेळ एकत्र बसून सामन्याचा आनंद लुटला.