आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी : महाराष्ट्राचा उपांत्य फेरीत प्रवेश, हिमाचल प्रदेशवर 10 गड्यांनी दणदणीत मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर 10 गडी राखून मात करत रणजी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. क गटात राज्याच्या संघाने 29 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. हिमाचल प्रदेश 24 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. महाराष्ट्राचा पुढील सामना शनिवारी आसामविरुद्ध होईल.
हिमाचलने कालच्या 1 बाद 98 धावांच्या पुढे खेळताना अखेरच्या दिवशी 319 धावा केल्या. संघाने दुसर्‍या डावात 59 धावांची नाममात्र आघाडी घेतली. वरुण शर्माने 44 आणि पारस डोग्राने अर्धशतक ठोकले. डोग्राने 148 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार खेचत 62 धावा काढल्या. त्याला अनुपम संकलेचाने रोहित मोटवाणीकरवी झेल बाद केले. त्यानंतर आलेल्या अभिनव बाली 50, निखिल गुप्ताने 28 आणि रिशी धवनने 60 धावा जोडल्या. रिशीने 77 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार लगावत झटपट अर्धशतक ठोकले. धोकादायक ठरणार्‍या रिशीला चिराग खुराणाने केदार जाधवच्या हाती झेल बाद केले. बिपुल शर्मा (7), एस.एन. शर्माने (3), व्ही. एस. मलिक (14) आणि पी. जैस्वालने (8 नाबाद) निराशा केली. महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचाने 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : (हिमाचल प्रदेश पहिला डाव 228 व दुसरा डाव 319 धावा. महाराष्ट्र पहिला डाव 488 आणि दुसरा डाव बिनबाद 63 धावा. खडीवाले 26, मोटवाणी 33 धावा.)

खडीवाले, मोटवाणीची अर्धशतकी भागीदारी
प्रत्युत्तरात महाराष्ट्रतर्फे सलामीवीर हर्षद खडीवाले (26) आणि कर्णधार रोहित मोटवाणीने (33 ) अभेद्य 63 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहितने 38 चेंडूत 6 चौकार आणि खडीवालेने 41 चेंडूत 3 चौकार खेचले. विजेत्या महाराष्ट्राला सात गुण देण्यात आले.