आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी करंडक क्रिकेट: जम्मू-काश्मीरकडून मुंबईला हुडहुडी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रलयंकारी पावसाने त्यांचे सर्वस्व वाहून नेले. त्यामध्ये क्रिकेट स्टेडियम, खेळपट्टीही शिल्लक राहिली नाही. नैसर्गिक आपत्ती जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूंची हिंमत मात्र पुरात वाहून नेऊ शकली नाही. ४० वेळा रणजी करंडक जिंकणा-या बलाढ्य मुंबईसमोर त्यांच्या घरात येऊन दोन हात करायला हा संघ आला, तो सरावाशिवाय. दोन दिवस वानखेडे स्टेडियमवर सराव केला तो या हंगामातील पहिला सराव… केवळ त्या सरावाच्या बळावर आणि अखेरपर्यंत लढण्याच्या जिद्दीने या संघाने आज रणजी स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मुंबईला ४ विकेटने पराभूत करण्याचा पराक्रम केला.

चौथ्या दिवशी विजयासाठी २३७ धावांचा पाठलाग करणा-या जम्मू-काश्मीर संघाने १ बाद ५८ धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. धावसंख्येत ८ धावांची भर पडते न पडते तोच संदीप सिंह तंबूत परतला. ३ बाद ११८ धावसंख्येवर मुंबई आपली झुंजार वृत्ती दाखवून पुनरागमन करील, अशी आशा वानखेडे स्टेडियमवरील अत्यल्प प्रेक्षकांना होती. मात्र मुंबईला यापूर्वीचा करिश्मा करता आला नाही. हरदीपसिंग (४१) आणि वसीम राजा (१६) या नाबाद जोडीने ७ व्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करून जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबईकडून निराशा
अनुभवी यजमान मुंबई संघ घरच्या मैदानावर गलितगात्र झालेला प्रथमच पाहावयास मिळाला. मुंबईच्या अपयशाला नवोदित खेळाडू, निवड समितीची धोरणे, गचाळ क्षेत्ररक्षण, अनाकलनीय नेतृत्व या गोष्टी जबाबदार आहेत.

युवीचे शतक; पंजाब विजयी
पातियाळा | युवराज सिंगच्या (१३०) शानदार शतकी खेळीच्या बळावर पंजाबने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली. या संघाने बुधवारी ब गटात हरियाणावर १२० धावांनी मात केली. संदीप शर्मा (३/३०), राजविंदर सिंग (३/५४) आणि सरबजित सिंग (३/७६) यांनी पंजाब संघाच्या विजयात योगदान दिले.

कर्नाटकची तामिळनाडूवर २८५ धावांनी मात
बंगळुरू । कर्नाटक संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज विजय मिळवला. या संघाने अ गटात तामिळनाडूचा २८५ धावांनी पराभव केला. विनय कुमार (३/२०) आणि एस. अरविंद (४/९) यांनी संघाला विजय मिळवून दिला.

महाराष्ट्र-ओडिशा सामना अनिर्णीत
अक्षय दरेकरचे तीन बळी
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यातील सामना बुधवारी अनिर्णीत राहिला. या वेळी ओडिशाकडून नटराज बेहरा (७४), बिपलाब समंत्रय (३१), निरंजन बेहरा (२१) यांनी केलेली खेळी व्यर्थ ठरली. महाराष्ट्राकडून अक्षय दरेकरने तीन, समद फल्लाह आणि श्रीकांत मुंढेने प्रत्येकी एक गडी बाद केला. दुस-या डावात ओडिशाने ७७ षटकांत पाच गडी गमावून १७८ धावा काढल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राने पहिल्या डावात ३७१ धावा काढल्या होत्या. याशिवाय या संघाने ६० धावांची आघाडी मिळवली होती. आता दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. आता महाराष्ट्र संघाच्या नावे एकूण तीन गुण झाले आहेत. महाराष्ट्राने पहिल्या डावात ३७१ धावा काढल्या होत्या. त्यानंतर चौथ्या दिवशी बुधवारी ओडिशाने बिनबाद १ धावेने दुस-या डावाला सुरुवात केली. दरम्यान, सलामीचा गिरिजा राऊत (१) झटपट बाद झाला. त्यानंतर निरंजन बेहरालाही (२१) फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही.