आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Match Maharashtra Vs Himachal Pradesh In Pune

रणजी: अंकितच्या अर्धशतकाने महाराष्ट्र मजबूत स्थितीत, हिमाचल प्रदेशविरुद्ध 4 बाद 319 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - औरंगाबादचा युवा तडफदार फलंदाज अंकित बावणेच्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने क गटातील रणजी सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध दुसर्‍या दिवसअखेर 4 बाद 319 धावा काढल्या. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी अंकितने नाबाद 76 धावा फटकावल्या. गेल्या काही सामन्यांत लौकिकानुसार कामगिरी करू न शकलेल्या अंकितने 201 मिनिटे खेळपट्टीवर झुंज देऊन फॉर्म परत मिळवला. ‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट..’ या म्हणीची प्रचिती अंकितने दिली.
अंकितने 169 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांसह नाबाद 76 धावा काढल्या. अंकितने सुरुवातीला सलामीवीर हर्षद खडीवालेसोबत 68 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. नंतर पाचव्या विकेटसाठी त्याने चिराग खुराणासोबत अभेद्य 82 धावांची भागीदारी करून महाराष्ट्राचा डाव सावरला. दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अंकितसोबत चिराग खुराणा 37 धावा काढून खेळत होता. त्याने 88 चेंडूचा सामना करताना 6 चौकार मारले.
खडीवालेचे शतक हुकले
तत्पूर्वी, महाराष्ट्राने सकाळी कालच्या बिनबाद 35 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी 91 धावांची मजबूत सलामी दिली. कर्णधार रोहित मोटवाणी 32 धावा काढून बाद झाला. रोहितने 93 चेंडूंत 4 चौकारांसह 32 धावा काढल्या. यानंतर खेळण्यास आलेल्या संग्राम अतितकरने खडीवालेसोबत दुसर्‍या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अतितकरने 56 चेंडूंत 7 चौकारांसह 49 धावा काढल्या. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. केदार जाधव अवघ्या 4 धावा काढून परतला.
विजय महत्त्वाचा...
संघ अडचणीत असताना या वेळी मधल्या फळीत मला मोठा स्कोअर करण्याची चांगली संधी मिळाली. ही संधी घरच्या मैदानावर मिळाली. मला ती दवडायची नव्हती. एकेक चेंडूवर लक्ष देत धावा काढल्या. माझे अर्धशतक संघाच्या कामी आले, याचा अधिक आनंद आहे. खरे तर मला माझे शतक, अर्धशतकापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा वाटतो.
- अंकित बावणे, क्रिकेटपटू.
धावफलक
हिमाचल प्रदेश पहिला डाव 228.
महाराष्ट्र पहिला डाव धावा चेंडू 4 6
खडीवाले झे. शर्मा गो. धवन 92 184 7 0
मोटवाणी पायचीत गो. मलिक 32 93 4 0
अतीतकर झे व गो. करणवीर 49 56 7 0
केदार जाधव झे. चोप्रा गो. धवन 04 10 1 0
अंकित बावणे नाबाद 76 169 8 0
चिराग खुराणा नाबाद 37 88 6 0
अवांतर : 29. एकूण : 97 षटकांत 4 बाद 319 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-91, 2-161, 3-169, 4-237. गोलंदाजी : व्ही.एस. मलिक 23-4-60-1, ऋषी धवन 30-2-105-2, पी. जैस्वाल 13-4-35-0, गंगता 6-1-29-0, विपुल 13-1-32-0, करणवीर 9-0-31-1, बाली 2-0-12-0, वरुण शर्मा 1-0-4-0.