आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूविरुद्ध राजस्थानची दमदार सुरुवात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये पाहुण्या राजस्थान संघाच्या सलामीवीरांनी शानदार कामगिरी करून दणकट सलामी दिली. राजस्थान संघाचा कर्णधार ऋषिकेश कानिटकरने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना राजस्थानच्या सलामीवीरांनी दिवसभरातील 90 षटके खेळून काढताना एकही विकेट जाऊ दिली आणि बिनबाद 221 धावा ठोकल्या.
एम.ए.चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी राजस्थानच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. तामिळनाडूच्या गोलंदाजांना खेळपट्टीचा लाभ उचलता आला नाही. दिवसभरात त्यांना राजस्थान संघाची एकही विकेट घेता आली नाही. राजस्थान संघाकडून सलामीवीर आकाश चोप्राने नाबाद 86 तर दुसरा सलामीवीर विनीत सक्सेनाने नाबाद 120 धावा ठोकून तामिळनाडूच्या गोलंदाजीची हवाच काढून टाकली. आकाश चोप्राने 273 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार मारले. चोप्राने अतिशय संथ फलंदाजी केली. विनीत सक्सेनाने 269 चेंडूंचा सामना करताना 16 चौकारांसह ही खेळी केली.
तामिळनाडूकडून कर्णधार वेगवान गोलंदाज बालाजीने 13 षटके गोलंदाजी करून 6 निर्धाव टाकली; मात्र त्याला यश मिळू शकले नाही. सामन्याच्या दुसºया दिवशी धावांचा डोंगर उभा करण्याची चांगली संधी आता राजस्थान संघाकडे आहे. गेल्या रणजी सत्रात राजस्थान संघाने उपांत्य सामन्यात तामिळनाडूला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यंदा फायनलमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने आहेत. यावेळी कोण बाजी मारतो, याकडे देशातील तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे

आक्रमक सुरुवात..!
राजस्थानच्या सलामीवीरांनी विरोधी संघाचा कर्णधार आणि प्रमुख गोलंदाज लक्ष्मीपथी बालाजीच्या पहिल्या षटकात 17 धावा वसूल केल्या. या षटकात आकाश चोप्राने एक तर विनितने दोन चौकार खेचले.

धावफलक
राजस्थान पहिला डाव धावा चेंडू 4 6
आकाश चोप्रा खेळत आहे 86 273 10 0
विनीत सक्सेना खेळत आहे 120 269 16 0
अवांतर : 15. एकूण : 90 षटकांत बिनबाद 221 धावा. गोलंदाजी : बालाजी 13-6-33-0, जे. कौशिक 18-6-30-0, यो. महेश 13-2-42-0, आर.ए. श्रीनिवास 30-11-55-0, सनी गुप्ता 13-1-40-0, मुकुंद 2-0-6-0, वासुदेवदास 1-0-5-0.