आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy, Final Mumbai Leads Over Saurashtra

रणजी अंतिम सामना : मुंबईने सौराष्ट्राला १४८ धावांतच गुंडाळले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून सुरु झालेल्या रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने सौराष्ट्राचा डाव पहिल्याच दिवशी केवळ १४८ धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने टिपलेल्या चार बळीमुळे सौराष्ट्राचा डाव गडगडला, धवलला मध्यममती गोलंदाज अभिषेक नायर व फिरकीपटू विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी टिपत मोलाची साथ दिली. कर्णधार अजित आगरकरने १ बळी टिपला. त्याआधी सकाळी आगरकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला.

सौराष्ट्राकडून अर्पित वासूदेवा याने ९ चौकारासह सर्वांधिक ५५ धावा केल्या. त्यानंतर मकवाना (२६) , उडाणकट (२२) व सलामीवर कोटक (१४) यांनीच थोडेफार योगदान दिले. उर्वरित कोणालाही चमकदार कामगिरी करता आली नाही.

सौराष्ट्राने रणजीच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली होती. तर, मुंबईने ४४ वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यात त्यांनी तब्बल ३९ वेळा विजेतेपद पटकावले आहे. गेल्या सहा वर्षापासून मुंबईला विजेतेपद मिळाले नाही. त्यामुळे सौराष्ट्र व मुंबईत जोरदार संघर्ष होईल, असे सांगितले जात होते. मात्र, सौराष्ट्राला पहिल्याच दिवशी मुंबईने बॅकफूटवर नेवून ठेवले आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावरुन तरी सौराष्ट्राला हे विजेतेपद जिंकण्याची शक्यता आहे असे वाटत नाही. मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकरबरोबर अनुभवी वसिम जाफर सारखा खेळाडू आहे.