पुणे - रणजी ट्रॉफीत बुधवारी स्वप्निल गुगळेच्या दीड शतकाच्या बळावर महाराष्ट्राने बलाढ्य दिल्लीविरुद्ध पहिल्या दिवशी ६ बाद ३१२ धावा केल्या. गुगळेने १७४ धावा ठोकल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी चिराग खुराणा ५५ धावांवर खेळत होता.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सलामीवीर स्वप्निल गुगळेने एकाकी झुंज देत २४३ चेंडूत २३ चौकार आणि २ षटकार खेचत १७४ धावा केल्या. हर्षद खडीवाले (३), रोहित मोटवाणी (१९), अंकित बावणे (१८), राहुल त्रिपाठी (११) आणि केदार जाधव (६) स्वस्तात बाद झाले. सातव्या क्रमांकावर आलेल्या चिराग खुराणाने १२६ चेंडूत ५ चौकार लगावत नाबाद ५५ धावा केल्या. अष्टपैलू श्रीकांत मुंढे नाबाद १६ धावांवर खेळत आहे. दिल्लीकडून सुमित नरवाल, विकास टोकस, मनन शर्मा, रजत भाटिया, वरुण सूदने प्रत्येकी १ बळी घेतला.
गुगळे-खुराणाची शतकी भागीदारी : स्वप्निल गुगळे व चिराग खुराणाने सहाव्या विकेटसाठी १७४ चेंडूत १०० धावांची भागीदारी रचली. तसेच गुगळे व रोहित मोटवाणीने ५० धावांची भागीदारी केली.