आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy : Maharashtra Team Challenge Before The Hyderabad

रणजी ट्रॉफी: हैदराबादसमोर आजपासून महाराष्ट्र संघाचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - घरच्या मैदानावर यजमान हैदराबाद संघासमोर रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आजपासून बलाढ्य महाराष्ट्राचे तगडे आव्हान असेल. या सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेल्या औरंगाबादच्या अंकित बावणे आणि विजय झोलकडे सर्वांची नजर असेल. जालन्याच्या विजय झोलने पदार्पणातील रणजी सामन्यात शानदार द्विशतक झळकावले होते. ही लय हैदराबादविरुद्ध कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
मुंबई-दिल्ली सामना
दुसरीकडे मुंबईच्या बीकेसी स्टेडियमवर यजमान मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना होईल. 40 वेळचा चॅम्पियन मुंबईने सलग दोन सामने जिंकून अ गटाच्या गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. दुसरीकडे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरासारखे टीम इंडियातील दिग्गज खेळाडू असलेल्या दिल्लीला अद्याप स्पर्धेत विजयाचे खाते उघडता आले नाही. हे त्रिकूट सपशेल अपयशी ठरल्याने दिल्लीचे दोन्ही सामने अनिर्णीत राहिले. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.
विदर्भ-ओडिशा सामना
नागपूरच्या मैदानावर यजमान विदर्भ आणि ओडिशा यांच्यातील रणजी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होईल. गत सामन्यात विदर्भने हरियाणावर मात करून रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. विजयाची ही लय कायम ठेवण्याचा यजमान टीमचा प्रयत्न असेल.
महाराष्‍ट्राच्या महिला विजयी
बुधवारी झालेल्या 19 वर्षांखालील महिला सुपर लीग स्पर्धेत महाराष्‍ट्राच्या मुलींनी मध्य प्रदेशवर 97 धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्‍ट्राच्या संघाने सलग दुसरा विजय मिळवला आणि संघाची कर्णधार स्मृती मानधनाने (71) अर्धशतक ठोकले. संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना महाराष्‍ट्राने 8 बाद 212 धावा काढल्या. बीडच्या मुक्ता मगरेने 49 चेंडूत 27 धावा केल्या. मुक्ताने 6.3 षटकांत 18 धावा देत 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा डाव 115 धावांवर संपुष्टात आला.