मुंबई - रणजी ट्रॉफीत तिस-या दिवशी तळातील फलंदाज श्रीकांत मुंढेच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर पहिल्या डावात महाराष्ट्राने ओडिशाविरुद्ध ६० धावांची आघाडी घेतली. ओडिशाने पहिल्या डावात ३११ धावा केल्या. दुस-या डावात तिस-या दिवसअखेर बिनबाद १ धाव झाली आहे.
कालच्या बिनबाद १२६ धावांच्या पुढे खेळताना महाराष्ट्राच्या सलामीवीर चिराग खुराणाने अर्धशतक पूर्ण केले. त्याने १८० चेंडूंत ५४ धावा केल्या. हर्षद खडिवाले शतक पूर्ण करू शकला नाही, ताे १८६ चेंडूंत १३ चौकार लगावत ८३ धावा काढून बाद झाला. युवा फलंदाज विजय झोल (१९), अंकित बावणे (१८), संग्राम अतितकर (८) आणि कर्णधार रोहित मोटवाणी (१९) स्वस्तात बाद झाले.
केदार जाधवने आक्रमक सुरुवात करत ४७ चेंडूंत ४४ धावा काढल्या. त्याला मगराजने प्रधानकरवी झेलबाद केले. तळातील फलंदाज श्रीकांत मुंढेने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकले. अक्षय दरेकरने १८ आणि डी. जोसेफने ९ धावा जोडल्या. ओडिशाच्या डी. बेहेराने ८२ धावांत ४ आणि समंत्राने ३६ धावांत ३ गडी बाद केले. दुस-या डावात ओडिशाने बिनबाद १ धाव केली आहे. त्याची सलामीवीर जोडी मैदानावर खेळत आहे. ते आणखी ५९ धावांनी पिछाडीवर आहेत.
संक्षिप्त धावफलक : ओडिशा पहिला डाव ३११, दुसरा डाव बिनबाद १. महाराष्ट्र पहिला डाव ३७१. (खडिवाले ८३, चिराग खुराणा ५४, श्रीकांत मुंढे ८२* धावा. डी. बेहेरा ४/८२, समंत्रा ३/३६).
श्रीकांत मुंढेची अष्टपैलू कामगिरी
महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढेने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने आठव्या स्थानावर येऊन दमदार नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने १७५ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद ८२ धावा केल्या. तत्पूर्वी त्याने गोलंदाजीतही कमाल केली. ३५ षटकांत १०३ धावा देत ४ फलंदाज टिपले. यात ६ षटके निर्धाव टाकली.