आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravi Shastri News In Marathi, Team India, BCCI, Divya Marathi

रवी शास्त्री बनणार संकटमोचक !, टीम इंडियाच्या संचालकपदी शास्त्रीची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 3-1 ने सपाटून पराभव झाल्यानंतर बीसीसीआयकडून संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्यात आले आहे. बीसीसीआयने संकटमोचक म्हणून रवी शास्त्री यांची वनडे मालिकेसाठी डायरेक्टर क्रिकेट (संचालक) म्हणून नियुक्ती केली आहे. भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक ट्रेवर पेनी आणि गोलंदाजी प्रशिक्षक जो. दावेस यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
डंकन फ्लेचर संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. बीसीसीआयचा त्यांच्यासोबत 2015 च्या वर्ल्डकपपर्यंत करार आहे. रवी शास्त्री यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. ही जबाबदारी फक्त दोन आठवड्यांसाठी असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रवी शास्त्रींवर अशी जबाबदारी सोपवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2007 मध्ये वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीतच टीम इंडिया बाहेर झाल्यानंतर शास्त्री यांची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या तरी हा बदल पाच सामन्यांच्या मालिकेपुरता मर्यादित असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ‘हे सर्व बदल आगामी दोन आठवड्यांसाठी मर्यादित राहतील. हे बदल वनडे मालिकेसाठी आहेत,’ असे बीसीसीआयने नमूद केले.

क्वीन्सलँडचे माजी वेगवान गोलंदाज दावेस 2011-12 पासून भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. या काळात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पेनी यांना 2011 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर फील्डिंग कोच बनवण्यात आले होते.

तीन भारतीय तारे
1. संजय बांगर : मूळ औरंगाबाद-बीडचा असलेल्या संजय बांगरने रणजीत रेल्वेकडून मैदान गाजवले. 2013 मध्ये निवृत्तीनंतर या वर्षी संजय बांगर आयपीएल 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोच होता. बांगरच्या मार्गदर्शनाखाली पंजाबने या वेळी जबरदस्त कामगिरी केली. गेले वर्षभर बांगर भारत अ संघाचासुद्धा कोच म्हणून कार्यरत आहे.
2. भरत अरुण : तामिळनाडूचा माजी वेगवान गोलंदाज भरत अरुणने भारताच्या 19 वर्षांखालील संघाला मार्गदर्शन केले आहे. भरत अरुण कोच असताना भारताच्या 19 वर्षांखालील संघाने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला होता.
3. आर. श्रीधर : बंगळुरू येथे राष्‍ट्रीय क्रिकेट अकादमीशी श्रीधर जुळलेले आहेत. याशिवाय यूएई येथे झालेल्या 19 वर्षांखालील भारताच्या संघाचे ते सहायक प्रशिक्षक होते. आयपीएल 2014 मध्ये श्रीधरने किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

फ्लेचर यांना नारळ ?
रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संचालकपदी नियुक्ती झाल्याने आता मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना लवकरच नारळ मिळेल, अशी शक्यता आहे. आगामी वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेपूर्वी फ्लेचर यांना पदावरुन दूर केले जाऊ शकते, किंवा ते स्वत: पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
० आता फ्लेचर यांच्याकडे संघातील महत्वाचे कसलेच अधिकारच राहिले नाहीत. शास्त्री निर्णय घेतील. याची जाणीव फ्लेचर यांना आहे. सपोर्ट स्टाफमध्येही त्यांच्या पसंतीचा कोणीही राहिला नाही.
० रवी शास्त्री धोनीसोबत रणनिती ठरवतील. सोबत संजय बांगर, भरत अरुण आणि एस. श्रीधर असतील. अशा परिस्थितीत फ्लेचर यांचे महत्व आपोआपच कमी होईल.