आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडेजा मोडू शकतो कुंबळेचा रेकॉर्ड; मायकेल क्लार्कला सहापैकी पाच वेळा केले बाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. या मालिकेत त्याने मायकेल क्लार्कला सहापैकी पाच वेळा बाद केले आहे. आता नवी दिल्लीत त्याने क्लार्कला आणखी एकवेळ बाद केले, तर तो अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो. आणखी दोन वेळा क्लार्कची विकेट काढली, तर तो कुंबळेला मागे टाकून नवा विक्रम रचू शकतो.

सोमवारी संपलेल्या मोहाली कसोटीत क्लार्कला पाचव्यांदा बाद करून जडेजाने प्रेक्षकांना पंजा दाखवला होता. 'मी क्लार्कला पाच वेळा बाद केले आहे,' असे पंजा दाखवून तो प्रेक्षकांना सांगत होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेने सर्वाधिक सहा वेळा बाद केले आहे. क्लार्कने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात अनिल कुंबळेचा सामना करूनच केली होती. 2004 मध्ये बंगळुरू कसोटीत क्लार्कने अनिल कुंबळेचा सामना करताना कसोटी कारकीर्दीची सुरुवात करताना 151 धावांची खेळी केली होती. मात्र, नंतर कुंबळेने क्लार्कला सहा वेळा बाद केले.

या मालिकेत क्लार्कला पाच वेळा बाद करून जडेजा आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा ऑफस्पिनर हरभजनसिंग, र्शीलंकेचा रंगना हेराथ, न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिट्टोरी यांनी प्रत्येकी चार वेळा क्लार्कचा अडथळा दूर केला. मालिकेतील अखेरचा सामना अद्याप व्हायचा असून, चौथी कसोटी नवी दिल्लीत होईल. अशात तो क्लार्कला आणखी एक वेळ बाद करून कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो किंवा दोन वेळा त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून कुंबळेच्या पुढे निघू शकतो.

जडेजाने क्लार्कला असे बाद केले

चेन्नई कसोटी: 1) क्लार्क झे. भुवनेश्वर गो. जडेजा 130

हैदराबाद कसोटी: 2) क्लार्क त्रि. गो. जडेजा 91 . 3) क्लार्क त्रि. गो. जडेजा 16

मोहाली कसोटी : 4) क्लार्क यष्टिचीत धोनी गो. जडेजा 0. 5) क्लार्क झे. पुजारा गो. जडेजा 18.