माद्रिद - ला लिगामध्ये रिअल माद्रिदला व्हॅलेन्सियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्याने रिअलच्या चषकावरील दावेदारीस जबरदस्त धक्का बसला आहे. दुसरीकडे अॅटलेटिको माद्रिदने लिव्हांटेवर 2-0 अशी मात करीत आगेकूच कायम ठेवली आहे.
या विजयामुळे अॅटलेटिकोला आता दोन सामन्यांमध्ये केवळ चार गुण आवश्यक आहेत, तर रिअल माद्रिदला विजय आवश्यक असताना त्यांना केवळ बरोबरी स्वीकारावी लागली. तेदेखील रोनाल्डोने एंज्युरी टाइममध्ये केलेल्या गोलमुळे शक्य झाले, अन्यथा पराभव पत्करावा लागण्याची स्थिती उत्पन्न झाली होती.
शेवटच्या सामन्यातच चषकाचे भवितव्य
या बरोबरीमुळे संघाची वाटचाल बिकट झाली आहे. या चषकाचा निकाल हा अंतिम सामन्यातच निश्चित होणार असल्याचे रिअल माद्रिदचा प्रशिक्षक कार्लो अॅनसेलोट्टी याने सांगितले. आता स्पर्धा ही अधिक चुरशीची झाली असून पहिल्या तीन संघांपैकी कुणीही त्यावर दावेदारी करू शकतो, असेही त्याने नमूद केले.
रोनाल्डोची जादू
सामना संपुष्टात येण्यापूर्वी मारियाच्या पासवर अप्रतिम गोल करीत रोनाल्डोने जादूचा प्रत्यय आणून दिला. ला लीगमधील हा त्याचा 17 वा तर यंदाच्या मोसमातला 50 वा गोल ठरला. रोनाल्डोने केलेल्या कामगिरीमुळेच संघाच्या अंतिम विजयाच्या आशा शिल्लक आहेत.
वर्णद्वेषी शेरेबाजी
अॅटलेटिको फॅन्सनी लिव्हान्टेचा मिडफील्डर पॅपे डिओपसमोर माकडासारखे चाळे करीत वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याची तक्रार त्याने केली. त्याआधी बार्सिलोनाचा फुटबॉलपटू दानी अल्वेस याच्यावर केळ्याची साल फेकल्याने त्यालादेखील वर्णद्वेषी शेरेबाजी सहन करावी लागल्याची तक्रार त्याने केली होती. त्यामुळे अॅटलेटिकोच्या विजयापेक्षाही या वर्णद्वेषी टिप्पणीचीच अधिक चर्चा झाली.