मुंबई - १९९७ च्या बार्बाडोस येथील कसोटीत भारताला अवघ्या १२० धावा काढून कसोटी जिंकता आली नव्हती. सचिन तेंडुलकरने
आपल्या आत्मचरित्रात नेमक्या याच गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे. त्या वेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेले डी. व्ही. सुब्बाराव यांनी भारतीय संघाच्या त्या वेळच्या मन:स्थितीबाबत सांगताना म्हटले आहे, फक्त कर्णधार सचिन तेंडुलकर आणि
राहुल द्रविड या दोनच भारतीय खेळाडूंना भारताच्या विजयाबाबत आशा वाटत होती. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणसह सर्व अन्य खेळाडू मात्र भारतीय संघ १२० धावसंख्या गाठू शकेल, याबाबत साशंक होते.
भारतीय खेळाडूंची ती मन:स्थिती पाहिल्यानंतर सुब्बाराव यांनी बीसीसीआयला बार्बाडोस कसोटी संपताक्षणीच भारतीय संघासाठी मानसोपचारतज्ज्ञ नेमावा, अशी शिफारस केली होती. सुब्बाराव यांनी डॉ. रुडी वेबस्टर यांच्या नावाची भारतीय संघासाठी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून शिफारस केली होती.
डॉ. रुडी वेबस्टर यांनी बार्बाडोसचे अमेरिकेतील राजदूत म्हणून भूमिका बजावली होती. त्यांनी वेस्ट इंडीज, श्रीलंका व ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाबरोबर मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले होते. सुब्बाराव यांनी क्रिकेटपटूंची खचलेली मानसिकता पाहून डॉ. वेबस्टर यांच्या नावाची शिफारस केली असावी.
१९९७ ला सुब्बाराव यांनी केली होती बीसीसीआयकडे शिफारस.