आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईशी ओळख सांगणारे ऑलिम्पिक शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विश्वातील अनेक शहरांना पाण्याने समृद्ध केले आहे. समुद्रकिनारी वसलेल्या शहरांना तर निसर्गाने भरभरून दिले. अशाच शहरांपैकी रिओ दि जानेरिओ हे एक शहर आहे. गेले ४ दिवस या शहरातून फिरताना अनेक गोष्टी जाणवल्या ज्या मुंबई शहराशी मिळत्या-जुळत्या वाटल्या. नेहमी परदेशात आल्यानंतर आपल्या देशापेक्षा, शहरापेक्षा वेगळेपणच अधिक जाणवते. मात्र, रिओच्या वेगळेपणात ओळखीचा अाभास होतो. विमानतळावरून निघाल्यानंतर पहिली ओळख सांगतात येथील झोपडीवजा टुमदार घरे. येथे या झोपड्यांना फावेला म्हणतात. ऑलिम्पिकला येणाऱ्यांपासून या फावेलांना आयोजकांनी पडद्याआड नेण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यालगतच्या अशा फावेलांना काही ठिकाणी काचेच्या आड ठेवण्यात आले आहे. डोंगराच्या उतारावर अशा अनेक फावेला नजरेस पडतात.
मुंबईची दुसरी ओळख सांगणारी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक जाम. अत्याधुनिक सोयी सुविधा आणि उपाययोजना करूनही रस्त्यावर लांबच लांब लागलेल्या मोटारींच्या रांगा अस्वस्थ करतात. खरं तर रिओ शहराने जगातल्या चांगल्या व शिस्तबद्ध वाहतूक सोयी आणि यंत्रणा राबविल्या आहेत. मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी केला आहे. ऑलिम्पिकसाठी विमानातून थेट ऑलिम्पिक स्टेडियमपर्यंतचे महामार्ग बांधले आहेत. प्रथेप्रमाणे ऑलिम्पिकशी संबंधित खेळाडू, पदाधिकारी आणि आलेल्या पाहुण्यांसाठी रस्त्यावर वेगळी मार्गिका राखून ठेवण्यात आली आहे. वाहतुकीवर नजर टाकल्यानंतर शहरातच सतत नजरेला पडणारे डोंगर किंवा हिरवेगार सुळके पुन्हा एकदा मुंबईची आठवण करून देतात. शहराच्या कॅन्व्हासच्या पार्श्वभूमीवर हिरवेगार डोंगर सतत लक्ष वेधून घेतात. आणखी एक गोष्टही तुम्हाला आकर्षित करते, ती म्हणजे येथील समुद्र किनारे. हे समुद्र किनारे स्थानिकांना आणि पर्यटकांना साद घालत असतात. या किनाऱ्यांना लालभडक रंगातील सायकलपटूंच्या अनेक मार्गिका सुशोभित करत आहेत. संपूर्ण शहरात मिळून एकत्र आल्यास सुमारे ४५० किलोमीटर्सचा मार्ग होईल अशी माहिती स्थानिकांनी दिली. या शहराचा भूगोल जसा मुंबईला जवळचा तसेच हवामानही. ऋतूंचा कालखंड वेगळा असला तरीही स्वरूप तेच आहे. रिओ शहरात फेरफटका मारताना आंब्याची अनेक झाडे दिसतात. त्यांना आता मोहर आला आहे. रिओवासीयांना हे आंबे डिसेंबर महिन्यातच मिळतात. ऑलिम्पिकच्या निमित्ताने पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. यजमानांपेक्षा अधिक उत्साह पाहुण्यांमध्ये आहे. रस्त्यावर जागोजागी अधिक पोलिस दिसायला लागले आहेत. आताच कळते की त्यांचे थकलेले पगार देण्यात आले आहेत. अनेक आर्थिक चढ-उतार पाहिलेले हे शहर एका नव्या स्वप्नाच्या प्रतीक्षेत आहे.
बातम्या आणखी आहेत...