आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाची संस्कृती दाखवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम अावश्यक आहे ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दु: ख, समस्या, मतभेद, वर्णद्वेष विसरून तमाम विश्वाला, विश्वातील भिन्न प्रवृत्तींना एकत्र आणणारा रिओ ऑलिम्पिक सोहळा सुरू झाला. जगातील दोनशेहून अधिक देशांचे प्रतिनिधी मैदानावर एकमेकांशी कठोर संघर्ष करतात. स्पर्धा संपली की एकमेकांच्या गळ्यात पडतात. पराजयाचे दु:ख विसरून विजेत्याचे अभिनंदन करतात. एकमेकांचा दुस्वास करत नाहीत. हीच शिकवण ऑलिम्पिक चळवळीने दिली. युद्ध, कुरबुरी, भांडणे विसरून कट्टर शत्रूदेखील या एकाच व्यासपीठावर नियमितपणे एकत्र येत आहेत, मैत्रीचे हात पुढे करत आहेत.

कठीण आर्थिक परिस्थितीतून चाललेल्या ब्राझीलनेही या चळवळीचे कार्य पुढे सुरू ठेवले. ऑलिम्पिक बजेट आणि त्यानंतरची संभाव्य करवाढ, यानंतरही जनता अखेर सरकारच्या पाठीशी उभी राहिली, हे विशेष. त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने स्वत:चे दु:ख जगाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. ऑलिम्पिकमधून लाभ लुटण्याच्या योजना आखल्या नाहीत. ज्या देशाकडे जगातील सर्वाधिक जंगलभाग आहे, वृक्षांनी प्रचंड संपदा आहे, ज्यांनी रिओ किंवा साओ पावलोसारख्या शहरात इमारती बांधून पैसे कमावण्यापेक्षा अधिकाधिक झाडे लावून परिसर हिरवागार ठेवला आहे, त्यांना “वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हे जगाला सांगण्याची गरज नव्हती. पण पृथ्वीला होणारा पुढचा धोका लक्षात घेऊन, त्यांनी जगातील लोभी लोकांना सावध करण्याची किमया या निमित्ताने साधली.

वितळणाऱ्या बर्फाच्या पाण्यामुळे वाढणारी समुद्राची पातळी ही गंभीर बाब आहे. याचा त्यांनी विचार करायला लावला. ब्राझीलमध्ये बेरोजगारी प्रचंड आहे. युवा पिढी बेकार, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. अमली पदार्थांच्या तस्करीकडे वळत आहे. त्यांना रोखण्याचे आव्हान या देशापुढे आहे. ऑलिम्पिकवरची उधळपट्टी जनतेला मान्य नाही. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या उद‌्घाटन सोहळ्यावरील खर्चाच्या तुलनेत अवघा १० टक्के आणि बीजिंग ऑलिम्पिक सोहळ्याच्या खर्चाच्या तुलनेत ५ टक्के खर्च करून त्यांनी सादर केलेला सोहळा कौतुकास्पद आहे. अथेन्स ऑलिम्पिकपासून उद‌्घाटन व समारोप सोहळे अधिकाधिक हायटेक करण्याचे आणि त्यावर प्रचंड खर्च करण्याची स्पर्धा सुरू झाली होती. बीजिंग ऑलिम्पिकने अथेन्सपेक्षा जास्त आणि ब्रिटनने बीजिंगपेक्षा जास्त खर्च समारंभांच्या आयोजनावर करण्यात धन्यता मानली होती.

कमी खर्चात काम करता येते, याची जाणीव ‘रिओ’ ऑलिम्पिक संघटना आणि भावी आयाेजकांना करून दिली. देशाची संस्कृती दाखविण्यासाठी पैसा नाही तर प्रेम अावश्यक आहे. स्वत:च्या पैशांनी अनेक गोष्टी विकत घेऊन समारंभांला आलेले कार्यकर्तेच देशाला सावरू शकतात. उद‌्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन जनतेने आपणही देशाचे, मातृभूमीचे देणे लागतो, हे दाखवून दिले.
बातम्या आणखी आहेत...