आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक नागरिकांपुढे तमाम विश्व नतमस्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशांततेच्या ज्वालामुखीवर सतत असलेल्या विश्वाला मैत्री, बंधुप्रेम आणि शांतीची साद देणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या रूपातली एक चळवळ रिओ दी जानेरिअोमध्ये शुक्रवारपासून सुरू होत आहे. ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा जगभरचा प्रवासच खेळाच्या शक्तीचे द्योतक आहे. कठीण कालखंडातून जात असलेल्यांसाठी नव्या आशा, उमेदीची किरणे घेऊन येणारी ही चळवळ घुसमटलेल्यांना मनाची कवाडे उघडण्याची संधी देणारी स्पर्धा तमाम विश्वाला एकवटण्याचे दर चार वर्षांनी एक निमित्त ठरते.

‘झिका’ डासांच्या भयाने पछाडलेल्या देशातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाला सुरक्षिततेची हमी देणारी स्पर्धा. झिकाच्या परिणामांच्या भीतीचाच राक्षस एवढा मोठा होता की आयत्या वेळी पुरस्कर्ते, आर्थिक मदत करणाऱ्यांनी आखडता हात घेतला. आर्थिक मंदीच्या आगीत प्रगत देशही होरपळत असताना अडचणीत असलेल्या ब्राझीलसाठी ही स्पर्धा म्हणजे वरदान न ठरता आपत्ती म्हणूनच आली. सत्तापालट आणि रिओ राज्याने जाहीर केलेली दिवाळखोरी यामुळे खचलेली जनता आज सुहास्यवदनाने क्रीडाविश्वातल्या सर्वोत्तम मानवी शक्तीच्या स्वागताला सज्ज झाली आहे. आर्थिक मंदी, बेकारी आणि रोगराई समस्यांना बाजूला सारून दु:ख चेहऱ्यावर न आणता ही जनता खंबीरपणे उभी आहे. सरकारच्या निषेधार्थ रात्री अंधार करून थाळ्यांचा नाद करणारे हे तेच हात देशात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यापुढे जोडले जात आहेत. विरोधी आणि उलटसुलट बातम्यांचा महापूर आला असतानाही जगातील सर्व नामवंत खेळाडू, देशांचे प्रतिनिधी रिओमध्ये दाखल झाले आहेत. पोटातील दु:ख ओठापर्यंत न येऊ देणाऱ्या स्थानिक नागरिकांपुढे तमाम विश्व नतमस्तक झाले आहे. अनेक उच्चशिक्षित, अंगी कौशल्य असणारे, एके काळी वैभवात लोळलेले लोक आज मिळेल ते काम करीत आहेत. आर्थिक हातभार लागेल म्हणून आपली घरे भाड्याने देऊन दूरवर, छोट्याशा जागांमध्ये राहत आहेत. त्यांना मदतीचा हात हवा आहे. भीक नको आहे. त्यांनी आपापल्या गरजा कमी केल्या आहेत. ऑलिम्पिकच्या याआधीच्या यजमानांनी आयोजनावर प्रचंड पैशाची उधळपट्टी केली.
पर्यटन व्यवसाय वाढेल हे त्यापाठीमागचे प्रमुख सूत्र होते. प्रत्यक्षात ऑलिम्पिक आयोजित करणाऱ्या देशांमध्ये किंवा त्या शहरांमध्ये स्पर्धांमुळे पर्यटन कधीच वाढले नाही. उलट नियमित येणाऱ्या पर्यटकांनीही ऑलिम्पिक स्पर्धांच्या ठिकाणी पाठ फिरवली असल्याचे सर्व आयोजकांचे अहवाल सांगतात. ‘रिओ’ने तर तशी कोणतीही अपेक्षा केली नाही. आधी सुरू होता तोच त्यांचा लढा आजही सुरू आहे, पुढेही सुरू राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...