आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सचिन तेंडुलकरने 198 कसोटी सामन्यांत 15837 धावा काढल्या आहेत. यात 51 शतके आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे. कधीकाळी रनमशीन असलेला मास्टर-ब्लास्टर गेल्या दोन वर्षांपासून कसोटी शतकाच्या प्रतीक्षेत आहे. मागच्या 24 महिन्यांत त्याने 21 कसोटी सामने खेळले. मात्र, यात तो एकही शतक ठोकू शकला नाही. या काळात त्याने 8 अर्धशतके निश्चित झळकावली. यात दोन वेळा तो शतकाच्या जवळ जाऊन बाद झाला.
दोन वेळा नर्व्हस नाइंटीजचा बळी
91 धावा : सचिनने 18 ते 22 ऑगस्ट 2011 रोजी इंग्लंडच्या ओव्हल येथे झालेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत 91 धावा काढल्या होत्या. या स्कोअरवर त्याला ब्रेसननने पायचीत केले.
94 धावा : वानखेडे स्टेडियमवर 22 ते 26 नोव्हेंबर 2011 दम्यान वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या तिस-या कसोटीत त्याचे शतक सहा धावांनी हुकले. रामपॉलच्या चेंडूवर डॅरेन सॅमीने त्याचा झेल घेतला.
80 च्या चक्रात दोन वेळा अडकला
80 धावा : सिडनीत 3 जानेवारी 2012 रोजी झालेल्या दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कच्या चेंडूवर माइक हसीने त्याचा झेल घेतला.
81 धावा : 22 ते 26 फेब्रुवारी 2013 दरम्यान चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनला 81 धावांवर ऑफस्पिनर नॅथन लॉयनने त्रिफळाचीत केले.
आणखी चार अर्धशतके
सचिनने इंग्लंडविरुद्ध डिसेंबर 2012 मध्ये 76 धावा, वेस्ट इंडीजविरुद्ध दिल्लीत नोव्हेंबर 2011 रोजी 76 धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे डिसेंबर 2011 रोजी 73 आणि इंग्लंडविरुद्ध नॉर्टिंगहॅम येथे 56 धावा काढल्या.
नऊ वेळा दहापेक्षा कमी धावांत झाला बाद
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटीत त्याने 1 धाव, वेस्ट इंडीजविरुद्ध दिल्लीत 7 आणि मुंबई कसोटीत 3 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीच्या दुस-या डावात 8 धावा, इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीच्या दोन्ही डावांत प्रत्येकी 8 धावा काढल्या. याशिवाय कोलकाता, नागपूर येथे 5 आणि 2 धावा, तर हैदराबाद 7 आणि दिल्लीत फक्त एक धाव काढली.
39 डावांत 16 वेळा झाला झेलबाद
मागच्या दोन वर्षांत शतकाशिवाय खेळणारा सचिन 39 डावांत 16 वेळा झेलबाद, 10 वेळा पायचीत आणि 8 वेळा त्रिफळाचीत झाला. दोन वेळा धावबाद आणि दोन वेळा तो नाबाद राहिला. एक वेळ त्याची फलंदाजीची वेळच आली नाही. इंग्लंडविरुद्ध सलग तीन डावांत तो बोल्ड झाला. दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावांत तो पायचीत झाला होता.
सचिन निवृत्ती घेऊ शकतो काय ?
सचिनने आतापर्यंत 198 कसोटी सामने खेळले आहेत. दोन आणखी कसोटी सामने खेळल्यानंतर त्याच्या नावे 200 कसोटी सामने होतील. दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यानंतर तो निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरीही सचिनबाबत काहीच सांगता येत नाही. वनडेसाठी त्याने ज्याप्रमाणे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे निवृत्ती जाहीर केली त्याप्रमाणे तो कोणत्याही दिवशी निवृत्तीची घोषणा करू शकतो.
सचिनच्या बॅटमधून शतक का नाही ?
* रिफ्लेक्सेस दुबळे झाले आहेत. आता तो पूर्वीसारखा यशस्वी राहिलेला नाही. - विनोद कांबळी.
* फुटवर्कवर मेहनत घेतली पाहिजे. - अशोक मल्होत्रा.
* आत्मविश्वास खालावला आहे. मात्र, चपळता पूर्वीसारखीच अजूनही आहे.
अजित वाडेकर.
* बॅटिंग ऑर्डर धोनीनंतर असेल तर चांगले होईल. - इरापल्ली प्रसन्ना.
* फिटनेस चांगला आणि फक्त एका मोठ्या खेळीची गरज आहे.
दिलीप वेंगसरकर.
* अर्धशतक तर झळकावत आहे, मात्र शतक का नाही, हे कोच डंकन फ्लेचरने बघितले पाहिजे. - शेन वॉर्न.
निवृत्तीची चर्चा योग्य नाही
* सचिनने भारतीय क्रिकेटला महत्त्वाचे योगदान दिले आहे. प्रत्येक मालिकेनंतर त्याने निवृत्ती घ्यावी की नाही यावर चर्चा करणे योग्य नाही.
एन. श्रीनिवासन, बीसीसीआय, अध्यक्ष.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.