आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यस्थीने प्रश्न सोडवावा! विंडीज क्रिकेट मंडळाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला विनवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वेस्ट इंडीज संघाच्या भारत दौ-यातील माघारीचे प्रकरण त्रयस्थांच्या मध्यस्थीने किंवा एकमेकांशी चर्चा करून सामोपचाराने सोडवावे, अशी विनंती वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरून यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे. या प्रकरणी विंडीज क्रिकेट बोर्डाला भारतीय न्यायालयात खेचू नये तसेच आयसीसीने हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी विनंतीही कॅमरून यांनी केली आहे.
गत अाठवड्यातच बीसीसीअायने भरपाई न मिळाल्यास येत्या सात दिवसात विंडीजच्या क्रिकेट मंडळाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली हाेती. बीसीसीआय सचिवांना ई-मेलद्वारे भारतीय क्रिकेट बोर्डाने दिलेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी विंडीज क्रिकेट बोर्डाने ही विनंती केली आहे.
बीसीसीआय व विंडीज क्रिकेट बोर्डाने या बाबतीत लवकरात लवकर व नजीकच्या काळात, उपलब्ध सोयीनुसार भेटून चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, अशी विनंती कॅमरून यांनी केली आहे. त्यासाठी ६० दिवसांचा किमान अवधी असावा, असेही त्यांनी सूचित केले आहे. चर्चेद्वारे, उभय पक्षांचे हितसंबंध अबाधित राखून मार्ग काढावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रतिसादच नाही : पटेल
बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी विंडीज बोर्डाने पत्रव्यवहाराला योग्य तो प्रतिसाद दिला नाही, असे विधान केले आहे. पटेल यांनी ७ नोव्हेंबर २०१४च्या आपल्या पत्राचा उल्लेखही न केल्याबद्दल कॅमरून यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी दुबई येथील आयसीसीच्या बैठकीदरम्यान आयसीसीच्या संचालकांची भेट घेऊन या प्रकरणी त्यांना हस्तक्षेप करून प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती.