आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सचिनमय’ कसोटी आजपासून; वानखेडेवर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधुनिक क्रिकेटमधील जाहिरातदारांचा मोठा ‘ब्रँड’ असा लौकिक प्राप्त करणा-या सचिन तेंडुलकरची समारोपाची, 200 वी क्रिकेट कसोटी गुरुवारपासून येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू होत आहे. भारत-विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतील या दुस-या क्रिकेट कसोटीचे अस्तित्वच सचिन तेंडुलकरच्या दोन तपांच्या प्रभावशाली क्रिकेट कारकीर्दीपुढे झाकले गेले आहे. सचिनच्या निवृत्तीची कसोटी आणि सचिनऽऽ, सचिनऽऽ असे आगळेवेगळे वातावरण वानखेडे स्टेडियम परिसरात निर्माण झाले आहे.
क्रिकेट मैदानाच्या क्षितिजावरून कायमसाठी अस्ताला जाणा-या सचिनची फलंदाजीची अखेरची झलक पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमभोवती जनसागर उसळला आहे. नवोदित क्रिकेटपटूंपासून वृद्ध क्रिकेट शौकिनांपर्यंत प्रत्येक जण सामन्याचे तिकीट मिळेल या आशेने स्टेडियमभोवती घुटमळताना दिसत आहे.
सचिन तेंडुलकरच्या समारोपाच्या कसोटीसाठी वानखेडे खेळपट्टीचा कॅन्व्हास सज्ज आहे. सुधीर नाईक यांनी मुंबईकर सचिनला, आपला सचिन संबोधून ठणठणीत खेळपट्टी तयार केली आहे. सचिन खेळपट्टी पाहण्यासाठी आला तेव्हा त्याच्या चेह-यावर समाधान दिसत होते. सुधीर नाईक यांनी सचिनला म्हटले, ‘खेळपट्टीच्या हिरव्या रंगावर जाऊ नकोस. तुझ्यासाठी धावा कुटण्यासाठी योग्य खेळपट्टी आहे. तू किमान अर्धशतकापलीकडे जाशील याची मला खात्री आहे आणि शतक केलेस तर ‘सोने पे सुहागा.’ सुधीर नाईक म्हणत होते, या खेळपट्टीवर चेंडू फारच उशिरा म्हणजे चौथ्या दिवशी वळायला लागेल. मात्र, खेळपट्टीची अधिक उसळी आणि प्रारंभीचा वेग यामुळे फलंदाजांना या खेळपट्टीचा आनंद अधिक लुटता येईल. मात्र, प्रारंभी खेळपट्टीचा ओलसरपणा व मुंबईतील हवेची आर्द्रता यामुळे गोलंदाजांना मदत होईल. त्या कालावधीत आपापल्या विकेट शाबूत ठेवणारे खेळाडू या खेळपट्टीवर यशस्वी होतील.
पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
सचिनच्या 200 व्या कसोटीचे औचित्य साधून वानखेडेच्या पत्रकार कक्षाला आज मुंबईतील एक लोकप्रिय राजकीय नेते, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला.
10 क्रमांकाचा टी-शर्टही निवृत्त!
क्रिकेटच्या विश्वात मागील दोन तपांपासून 10 व्या क्रमांकाच्या टी-शर्टचे सातत्याने आकर्षण आणि आदर राहिला आहे. कारण, हा टी-शर्ट आहे लाडक्या सचिनचा. मात्र, गुरुवारपासून सुरू होणा-या कसोटीनंतर क्रिकेटचा देव क्रिकेटला अलविदा करणार आहे. याचबरोबरी 10 क्रमांकाचाही टी-शर्ट निवृत्त होईल. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडे निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
चंद्रपॉलसाठी दुहेरी योग
वेस्ट इंडीजच्या शिवनारायण चंद्रपॉलसाठी गुरुवारपासून सुरूहोणारी कसोटी ही दुहेरी योग जुळवून आणणारी आहे. यादरम्यान तो करिअरमधील 150 वी कसोटी खेळणार आहे. विंडीजकडून 150 कसोटी खेळणारा चंद्रपॉल हा एकमेव फलंदाज ठरणार आहे. योगायोगाने तो सचिनसोबत करिअरमधील आपली अविस्मरणीय कसोटी खेळत आहे.
1600 कोटींचा सट्टा?
सचिन आणि सट्टाबाजार हे एक प्रत्यक्षरीत्या जुळून आलेले क्रिकेट विश्वातील समीकरण आहे. सचिनच्या फलंदाजीने अनेकांना वेड लावले आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडू त्याचे फॅन आहेत. मात्र, दुसरीकडे सचिनच्या याच फलंदाजीमुळे सट्टाबाजार फुलून निघतो. आता शेवटची कसोटी खेळत असलेल्या सचिनच्या खेळीवर तब्बल 1600 कोटींचा सट्टा लागला आहे.
पूर्ण होणार 16 हजार धावांचा विक्रम!
क्रिकेटच्या करिअरमध्ये तब्बल 24 वर्षे सचिनने आंतरराष्टÑीय मैदानावर आपले वर्चस्व गाजवले. त्याने आतापर्यंत करिअरमध्ये 199 कसोटी खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 53.71 च्या सरासरीने आतापर्यत 15 हजार 847 धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. यामध्ये 51 शतके आणि 67 अर्धशतकांचाही समावेश आहे. आता त्याला कसोटी क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा विक्रमी पल्ला गाठण्यासाठी अवघ्या 153 धावांची आवश्यकता आहे. आपल्या शेवटच्या कसोटीत सचिन शतक झळकावण्याची शक्यताही सर्वत्र वर्तवली जात आहे. त्यामुळे हा विक्रम या कसोटीत नक्कीच नोंदवला जाईल, अशी आशा आहे.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, प्रज्ञान ओझा, इशांत शर्मा, अमित मिश्रा.
वेस्ट इंडीज : डॅरेन सॅमी (कर्णधार), क्रिस गेल, केरोन पॉवेल, डॅरेन ब्राव्हो, मार्लोन सॅम्युअल्स, नरसिंग देवनारायण, एस. चंद्रपॉल, डी. रामदीन, टिनो बेस्ट, वीरसामी पेरॉमाल, शेल्डन कोट्टेरेल्ल, किर्क एडवर्ड, केमार रोच, सी. वाल्टन.